धोब्याकडे धुण्यासाठी कपडे दिले आणि सदऱ्याची बटणे तुटली, कुठे शिवण उसवली, साडीला खोचा पडला अशी उदाहरणे नेहमीच घडतात. असे आढळल्यानंतर बाचाबाची, दमबाजी आणि मग कधीतरी किरकोळ नुकसानभरपाई घेऊन प्रकरण मिटवले जाते पुन्हा या धोब्याच्या वाटेला न जाण्याची शपथ घेऊन. परंतु नात्यातील एका लग्नात घालण्यासाठीचा घागरा-चोली ड्रायक्लीनिंगसाठी धोब्याकडे दिल्यावर तो थेट जळून, फाटूनच हाती पडला. मग मात्र एका महिलेने रुद्रावतार धारण करीत थेट ग्राहक मंचाकडे धाव घेतली. मंचानेही तिला न्याय देत वाया गेलेल्या घागरा-चोलीसाठी तब्बल ४५ हजार रुपयांची नुकसानभरपाई तिला मिळवून दिली.
बीना फ्युरिया यांनी १४ डिसेंबर २०११ रोजी लग्नासाठी शिवलेला घागरा-चोली आणि दुपट्टा ‘ड्रायक्लीन’साठी ‘महावीर क्लीनर अ‍ॅण्ड डायर्स’कडे दिला होता. त्यासाठी त्यांनी ४३० रुपये दिले होते. आठवडय़ाने कपडे मिळतील, असे दुकानदाराने त्यांना सांगितले. त्यानुसार फ्युरिया २० डिसेंबर २०११ रोजी कपडे घेण्यासाठी दुकानात गेल्या. त्या वेळेस कपडे दुसऱ्या ‘ड्रायक्लीनर’कडे दिले आहेत आणि त्याने ते अद्याप आणून दिले नाहीत, असे दुकानदाराने त्यांना सांगितले. त्यानंतरही अनेकदा फ्युरिया यांनी दुकानात जाऊन कपडय़ांबाबत विचारणा केली. परंतु अद्याप ते आले नसल्याचेच वारंवार त्यांना सांगण्यात आले. काही दिवसांनी कपडे हातात पडल्यावर फ्युरिया यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु हा नि:श्वास काही घटिकाच मर्यादित ठरला. दुकानदाराने ‘ड्रायक्लीन’ करून पाठवलेले कपडे उघडून पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांनी लग्नासाठी शिवलेला सिल्कचा घागरा-चोली काही ठिकाणी फाटला आणि जळाला होता. त्यांनी लगेचच दुकानात जाऊन त्याबाबत तक्रारही केली.
दुसऱ्या ‘ड्रायक्लीनर’कडे कपडे देण्याचे आपण सांगितले नव्हते आणि दुकानदाराच्या निष्काळजीपणामुळे आपल्याला घागरा-चोली पुन्हा वापरता येणार नाही, असा दावा करीत दुकानदाराकडे त्यांनी नुकसान भरपाई मागितली. दुकानदाराने १० हजार रुपये देण्याची तयारीही दाखवली. ही रक्कम कपडय़ांच्या मूळ रक्कमेपेक्षा कमी असल्याने फ्युरिया यांनी आधी फेब्रुवारी व नंतर एप्रिलमध्ये दुकानदाराला नोटीस पाठवली. दुसऱ्या नोटीसला उत्तर देताना दुकानदाराने कपडय़ांचे नुकसान झाल्याचे मान्य केले. मात्र त्याच वेळी नुकसान भरपाई देऊ शकत नसल्याचे किंबहुना आपण त्यासाठी जबाबदार नसल्याचे त्याने कळविले. एवढेच नव्हे, तर कपडे खूप जुने असल्याने ते ‘ड्रायक्लीन’ दरम्यान खराब झाल्याचा अजब दावाही त्याने केला.
अखेर फ्युरिया यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेत दुकानदाराविरुद्ध तक्रार दाखल केली. सुनावणीच्या वेळीही दुकानदार आपल्या दाव्यावर ठाम होता. परंतु मंचासमोरील केवळ एकाच सुनावणीसाठी तो हजर झाल्याचे आणि त्याचा दावा खोटा असल्याचे फ्युरिया यांनी मंचाच्या निदर्शनास आणून दिले. कपडे खराब झाल्याचे दुकानदाराने मान्य केले ही बाब लक्षात घेऊन मंचाने फ्युरिया यांच्या बाजूने एकतर्फी निर्णय देत दुकानदाराला नुकसान भरपाई म्हणून ४५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.