अॅम्बॅसेडर, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांचा समावेश
नवी मुंबई पालिकेची जुनी झालेली ४५ वाहने लवकरच भंगारात काढली जाणार आहेत. त्यात रुग्णवाहिका, कुत्रे पकडण्याची वाहने, अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या अॅम्बेसडर यांचा समावेश आहे. या वाहनांचा आता दुरुस्ती खर्च वाढणार असल्याने ती भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
त्यातील २१ वाहने ही चालू स्थितीत आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणात वाहने भंगारात काढल्यानंतर त्यांच्या जागी कंत्राटी पद्धतीने वाहने घ्यावी लागणार आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या स्थापनेला आता २३ वर्षे झालेली आहेत. तेव्हापासून पालिकेने टप्प्याटप्प्याने अनेक वाहने विकत घेतलेली आहेत. त्यात अधिकाऱ्यांसाठी जीप, पदाधिकाऱ्यांसाठी अॅम्बॅसेडर, रुग्णवाहिका, अग्निशमन दलासाठी वाहनांचा समावेश आहे. मात्र आता ही वाहने आता पांढरा हत्ती झाल्याने त्यांना भंगारात काढण्याशिवाय पालिकेसमोर दुसरा पर्याय नाही. त्यासाठी पालिकेने सर्वसाधारण सभेची परवानगी मागितली आहे. या वाहनांचे अनेक भाग आता खराब झाल्याने त्यांना दुरुस्त करण्यासाठी कार्यशाळेत दिल्यास २० लाख रुपये खर्च येईल, असा वाहन विभागाचा अभिप्राय आहे. त्यामुळे या वाहनांवर आता दुरुस्तीचा वायफळ खर्च करीत राहण्यापेक्षा त्यांना भंगारात विकणे योग्य होईल, असे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे पालिकेच्या मुख्यालयाबाहेर उभी असलेली अनेक वाहने भंगारात विकली जाणार आहेत. पालिकेच्या या भंगार विक्रीसाठी अनेक कंत्राटदार उत्सुक आहेत. या ४५ वाहनात २१ वाहने सध्या चालू स्थितीत आहेत पण त्यांची अवस्था खिळखिळी झाली असून अधिकारी पदाधिकाऱ्यांना प्रवासासाठी योग्य नाहीत. त्यामुळे नवीन मुख्यालयात जाण्यापूर्वी हे भंगार विकून टाकले जाणार आहे, असे दिसून येते
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2014 8:16 am