यावर्षी जिल्ह्य़ातील ४५० गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे. उद्योगांकडून वर्धा, इरई, वैनगंगा या प्रमुख नद्यांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्याची उचल होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, तर अत्यल्प पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिड ते दोन मिटरने खोल गेल्याने ग्रामीण भागात एप्रिल व मे महिन्यात विहिरी, हातपंप कोरडे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या जिल्ह्य़ात एकूण १८०० गावे असून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखडय़ानुसार ४५० गावांना टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. यातील बहुतांश गावे चंद्रपूर, भद्रावती, जिवती, राजुरा व कोरपना या पाच तालुक्यातील आहेत. १५ मार्चपर्यंत तरी एकाही गावात टंॅकर लावण्यात आले नसले तरी तीव्र उन्हाळ्याच्या मे महिन्यात जिवती व भद्रावती या तालुक्यातील काही गावांना टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या जिल्ह्य़ात पाण्याचा सर्वाधिक वापर उद्योगांकडून होतो. त्यामुळेच ४५० गावांना पाणीटंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे. यातील बहुतांश गावे वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, उमा नदीच्या काठावरील आहेत.
वर्धा नदीवरून सर्वाधिक २० उद्योग २०१.५७९ दलघमी पाण्याची उचल करतात. त्यात वर्धा पॉवर ४२.१५ दलघमी, नागपूर एनर्जी इन्फ्रा ४२ दलघमी, नारंडा येथील मुरली अ‍ॅग्रो १९.२३, बीएस इस्मात १०, शालिवाहन कंस्ट्रक्शन १० दलघमी, यासोबतच एसीसी, अल्ट्राटेक, अंबूजा, बिल्ट या मोठय़ा उद्योगांकडूनही पाण्याची उचल होत आहे. त्या पाठोपाठ ईरई नदीचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे, तर वैनगंगा व पैनगंगाची पाणी पुरवठय़ाची क्षमताही कमी होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता नदी काठावरील गावकऱ्यांनी आतापासूनच ओरड करायला सुरुवात केलेली आहे. जिवती, कोरपना, राजुरा, भद्रावती व चंद्रपूर या चार तालुक्यात तर यंदा भीषण पाणीटंचाईचे चित्र आहे. बिल्ट, एसीसी, अल्ट्राटेक या उद्योगांकडून वर्धा नदीतून सर्वाधिक पाण्याची उचल केली जाते. त्यासोबतच बहुतांश गावातील नळयोजना  वर्धा नदीवर आहेत, तसेच एमआयडीसी, चांदा आयुध निर्माणी, चंद्रपूर शहर, भद्रावती, वरोरा, राजुरा व बल्लारपूर या प्रमुख शहरांनाही वर्धा नदीतूनच पाणी पुरवठा होतो. गावांसोबतच शहरांनाही पाणीटंचाईची झळ सोसावी लागू नये म्हणून आतापासूनच प्रशासनाने उद्योगांना तसे निर्देश देणे सुरू केलेले आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात जवळपास २५ टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे टंॅकरची व्यवस्था मार्चमध्येच करून ठेवण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. उद्योगांनी पाण्याचा जपून व काळजीपूर्वक वापर केला तर संभाव्य पाणीटंचाईवर मात करणे सहज शक्य आहे.
 गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थिती अतिशय भयावह असल्याने सिंचन विभाग व जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उद्योगांच्या पाणी पुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासूनही उद्योगांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली, तर गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळेल अन्यथा, गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे इतकी वाईट परिस्थिती गावात आतापासूनच बघायला मिळत आहे. केवळ गावातच नाही, तर शहरातील बहुतांश भागांनाही टंचाई परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे एमआयडीसी व तेथील उद्योगांचा पाणी पुरवठा उन्हाळ्यापुरता कपात करण्याची मागणी समोर आलेली आहे.
यंदा मुबलक पाऊस न पडल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी दिड ते दोन मिटरने खोल गेली आहे. त्याचा परिणाम एप्रिल व मे महिन्यात विहिरी व हातपंपाची पाण्याची पातळी खोल जाणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने टंचाईचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे.