इचलकरंजी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी रविवारी गावभाग पोलिसांनी ५ जणांना अटक केली. या सर्वाना न्यायालयासमोर उभे केले असता २७ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आत्तापर्यंत सतरा जणांना अटक केली असून सुमारे तीनशे जणांवर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळत आहेत.
    इचलकरंजी येथे विसर्जन मिरवणूक पुढे ढकलण्याच्या कारणावरून पोलीस आणि जमावांत धुमश्चक्री झाली होती. यावेळी पोलिसांवर आणि पोलीस ठाण्यावरही तुफान दगडफेक झाल्याने तीन पोलीस अधिकारी आणि राज्य राखीव दलाचे सहा जवान जखमी झाले होते. त्यामुळे विसर्जन मिरवणूक सुमारे तीन तास ठप्प होऊन शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी शहरात ठाण मांडून कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या होत्या. तसेच याप्रकरणी सुमारे तीनशे जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.या गुन्हय़ाचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक आणि गुन्हे अन्वेषण पथकाचे अधिकार करत आहेत. या पथकाकडून गुन्ह्य़ातील संशयित आरोपींची धरपडक सुरू असून आत्तापर्यंत सतराजणांना अटक केली आहे. यापकी आज अटक केलेल्या समरजित शिवाजी पाटील (वय २४, रा. अवधूत आखाडा), शैलेश संतोष घोरपडे (वय १९), सागर भाऊसो डफेदार (वय २०, दोघे रा. अनुबाई शाळेजवळ), सुरज पिराजी काळे ( वय २१, रा. आंबी गल्ली) आणि गुंडू बजरंग जयताळकर ( वय १९, रा. राममंदिरजवळ) या पाचजणांना अटक केली.