News Flash

एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

गोकुळपेठ बाजारपेठेतील चार मजली अंजिक्य प्लाझा या अपार्टमेंटच्या पाíर्कगमधील वाहनांना आग लागल्यामुळे त्यात राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच जणांची मृत्यू होऊन १३ दुचाकी वाहनेही जळून खाक

| May 24, 2014 01:18 am

गोकुळपेठ बाजारपेठेतील चार मजली अंजिक्य प्लाझा या अपार्टमेंटच्या पाíर्कगमधील वाहनांना आग लागल्यामुळे त्यात राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच जणांची मृत्यू होऊन १३ दुचाकी वाहनेही जळून खाक झाली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणल्याने आणि अपार्टमेंटमधील लोकांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने अनेकांचे जीव वाचले.
मृतांमध्ये सलीला प्रकाश शिरिया (६२), रागिणी निशांत शिरिया (३२), श्रृती श्रीकांत माली (२५) या तीन महिलांसह निरांश निशांत शिरिया (अडीच वर्ष), शहाणा श्रीकांत माली (२) या दोन चिमुरडय़ांचा समावेश आहे. गोकुठपेठेत अजिंक्य अपार्टमेंटमध्ये १३ सदनिका असून त्यातील १२ सदनिकांमध्ये लोक राहत आहेत. शिरिया कुटुंब पहिला माळ्यावर राहतात. सर्व लोक झोपलेले असताना रात्री १२ वाजताच्या सुमारास पाकिँगमध्ये एका गाडीला आग लागल्याचे चौकीदार लेखरामच्या लक्षात आले. लेखराम पत्नी व मुलासह पार्किंगच्या जागेतच एका खोलीत राहत असल्यामुळे त्याने पत्नी आणि मुलाला लगेच घरातून बाहेर काढले आणि ही माहिती अपार्टमधील इतरांना देण्यासाठी वर जात असताना आग भडकली. यावेळी अपार्टमेंटमध्ये २२ दुचाकी व २ चारचाकी वाहने होती. लेखराम ओरडत असताना सदनिकांमधील लोक मिळेल त्या मार्गाने खाली येत होते, तर काहीं आपापल्या घरातच थांबले. पहिल्या माळ्यावरील निशांत शिरिया, आई सलीला, पत्नी रागिणी, अडीच वर्षीय मुलगा निरांश, बहीण श्रृती आणि तिची २ वर्षीय मुलगी शहाणा या सर्वांसह भीतीपोटी घर बंद करून खाली उतरण्यासाठी लिफ्टमध्ये बसले व लिफ्ट खाली आल्यावर दरवाजा उघडताच आगीचा डोंब उसळला. पाकिँगमध्ये सर्वच वाहनांनी पेट घेतल्याने आगीने रौद्ररोप धारण केले होते. त्यातच वीज गेली. त्या आगीत लिफ्टचे दार कसेबसे उघडले तर समोर काहीच दिसत नव्हते. त्यातून निशांत आगीच्या विळख्यातून कसाबसा बाहेर पडला. मात्र, त्यांच्या देखत त्यांच्या कुटुंबातील पाच जण मृत्युमुखी पडले. त्यांचे मृतदेह मेडिकलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविले.  अपार्टमेंटमधील १० फ्लॅटधारकांची १३ दुचाकी वाहने जळून खाक झाली. दरम्यान, अर्धा तासांनी अग्निशमनाच्या पाच गाडय़ा आल्याने त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. अपार्टमधील इतरांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रयत्न करीत होते. काही लोक टेरेसवरून पाईप लाईनने खाली उतरले तर महिलांना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खाली उतरविले. या घटनेनंतर अंबाझरी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात गर्दी वाढू लागली.  सलीला शारिया या भारतीय विद्या भवन्समधून दोन वर्षांपूर्वी मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. मुलगी श्रृती माली ही प्रतापनगरमध्ये राहते. कुठल्याही तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि पती श्रीकांत मुंबईला गेले असल्यामुळे ती दोन दिवस आधीच लहान मुलीला घेऊन आईकडे राहण्यासाठी आली होती. श्रृती लक्ष्मीनगरमधील टॉडलर्स कीड कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका आहे. तिची मोठी मुलगी निशांका समर कॅम्पला गेली होती. निशांत शिरिया कंत्राटदार आहेत. श्रीकांत माली यांना या घटनेची माहिती कळताच ते सकाळी नागपुरात पोहोचले.
या एकाच कुटुंबातील पाच सदस्यांच्या मृत्यूने परिसर आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाचही मृतदेहावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या ठिकाणी राहणारा चौकीदार लेखरामने झोपेलेल्या  पत्नी व मुलाला लगेच बाहेर काढल्याने ते बचावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 1:18 am

Web Title: 5 dead in major fire at a residential building in nagpur
Next Stories
1 संजय खोब्रागडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
2 विदर्भावर सूर्य कोपला..
3 राज्यातील पहिलेवहिले अत्याधुनिक ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’
Just Now!
X