महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने नागपुरातील अद्ययावत प्रकल्पामध्ये पाच लाखावा ट्रॅक्टर तयार केला आहे. देशातील हा एकात्मिक प्रकल्प असून ट्रॅक्टर निर्मितीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. भारतीय ट्रॅक्टर क्षेत्रात रोबोटिक पेंटिंग युनिट सुरू करण्याचे श्रेय याच प्रकल्पाला जाते. २०१३ या आर्थिक वर्षांत ६६ हजार, ३९६ ट्रॅक्टर्स या प्रकल्पात तयार झाले. महिंद्राच्या नागपूर ट्रॅक्टर संयंत्रातील एका वर्षांतील हे सर्वाधिक उत्पादन आहे. या प्रकल्पात शेतकी समूदायाची उत्पादकता वाढविण्यासाठी अणि ग्रामीण भागाची भरभराट करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या बाबतीत सरस उत्पादनाची निर्मिती करू शकतो, असा विश्वास मिहद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरच्या नागपूर संयंत्राचे प्रमुख के.जी. शेणॉय यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
हिंगणा औद्योगिक परिसरात १९७० मध्ये ४५ एकर क्षेत्रात ५८ हजार २३३  चौरस फूट जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. अर्जुन, भूमीपुत्र व सरपंच या ट्रॅक्टरच्या ब्रँडचे उत्पादन या प्रकल्पात होत आहे. या प्रकल्पात पाच लाख ट्रॅक्टरचे उत्पादन करणे हे महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरच्या इतिहासातील यश आहे. यामुळे मैलाचा दगड रोवला गेला असून यातून ग्राहकांचा विश्वास वाढत असल्याचे दिसत आहे. सध्या नागपूर प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता ९० हजार ट्रॅक्टरची आहे. या प्रकल्पात तीन हजाराहून अधिक कामगार काम करीत आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अंदाजे ३३९.०१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पात विविध प्रकारच्या ट्रॅक्टरची निर्मिती केली जाऊ शकते. दर चार मिनिटांनी एक ट्रॅक्टर बाहेर आणण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. प्रकल्पात महिंद्रा एक्सलन्स ट्रेनिंग सेंटरही आहे. विक्रेते, वितरक व कर्मचाऱ्यांसाठी ही जागतिक दर्जाची प्रशिक्षण सुविधा आहे. या केंद्राचा वापर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जात आहे.
पर्यावरणपुरक उपक्रम उपक्रम काळाची गरज ठरत आहेत. या प्रकल्पाने सौर व बायोगॅस अशा पर्यायी उर्जेच्या वापरातून कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. महिंद्रा समूहाने कार्बन कमी करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. हा प्रकल्प ऊर्जाक्षम इमारतीमार्फत शाश्वतता आबादित राखतो. प्रक्रिया केलेल्या प्रकल्पातील पाण्याचा वापर केला जातो. परिसरातील हिरवळ वाढण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाने अंदाजे पाच लाख रोपे लावली आहेत, असे शेणॉय म्हणाले. प्रकल्पातील विविध विभागातील प्रमुख्यांनी त्यांच्या विभागातील उत्पादन कार्याची माहिती दिली.