केदारनाथ यात्रेसाठी गेलेली जिल्ह्य़ातील परतूरचे अपक्ष आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या कुटुंबातील पाच सदस्य अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेले यात्रेकरू सुखरूप परत यावेत, यासाठी शुक्रवारी (दि. २८) जालना येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जालना येथील व्यापारी व उद्योजक राजू जेथलिया यांच्या सरस्वती कॉलनी (मस्तगड) येथे दुपारी ४ वाजता ही प्रार्थना सभा होणार आहे.
केदारनाथ यात्रेसाठी गेलेले आमदार जेथलिया यांचे बंधू दिनेशकुमार व त्यांच्या पत्नी दुर्गादेवी, पुत्र नरेश, स्नुषा खुशबू नरेशकुमार आणि काकू भागीरथी (शांता) मदनलाल जेथलिया यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी आमदार जेथलिया ८ दिवसांपूर्वी डेहराडून येथे गेले होते. त्यांनी तेथील मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या कुटुंबातील बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले. परंतु या पाच सदस्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. दरम्यान आज सायंकाळी आमदार जेथलिया डेहराडून येथून जालना शहरात परतले. यात्रेच्या वेळी केदारनाथ ते गौरीकुं ड दरम्यान हे कुटुंबीय असताना १६ जून रोजी आमदार जेथलिया यांना दिनेशकुमार यांचा शेवटचा फोन आला होता. यात्रेस गेलेल्या आमदार जेथलिया यांच्या कुटुंबातील ८ सदस्यांपैकी त्यांचे बंधू विजय जेथलिया आणि त्यांच्या पत्नी सुनीता विजय त्याचप्रमाणे मुलगा सुजय हे तीन सदस्य परतले आहेत.