उत्तराखंडंमधील चारधाम यात्रेला विदर्भातून मोठय़ा प्रमाणात लोक गेले असताना आलेल्या जलप्रलयामुळे अनेकजण त्या ठिकाणी अडकून पडले होते. त्यातील नंदनवन परिसरातील खेतान कुटुंबातील पाच सदस्यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. केव्हा तरी त्यांच्यापैकी कोणाचा तरी आम्ही सुरक्षित असल्याचा एखादा तरी दूरध्वनी येईल, अशी आस लावून परिवारातील सदस्य बसले आहेत.
उन्हा़ळ्याच्या सुटय़ा लागल्यामुळे परिवारातील सदस्यांना कुठेतरी बाहेर न्यावे या उद्देशाने महेश खेतान, त्यांची पत्नी सरोज खेतान, मुलगी राशी, निधी आणि लहान मुलगा रिशीसह ५ जूनला नागपूरवरून रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत गाडोदिया परिवारातील ७ आणि साबू परिवारातील ३ सदस्य सोबत होते. १४ जूनला हे सर्व केदारनाथला पोहचल्यानंतर १५ जूनला रात्री आलेल्या महाप्रलयानंतर या तीनही परिवाराशी काहीच संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे तिघांच्या परिवारातील सदस्य चिंतेत असून काही नातेवाईक उत्तराखंडला रवाना झाले आहे. महेश खेतान यांचे मोठे बंधू राजेश खेतान यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले, चारधाम यात्रेसाठी लहान भाऊ महेश परिवारासह ५ जूनला नागपूरवरून रवाना झाल्यानंतर दरम्यानच्या काळात त्यांच्याशी दोन ते तीन वेळा बोलणे झाले.  मात्र त्यानंतर त्याच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. गाडोदिया आणि साबू परिवारातील सदस्य त्यांच्या सोबत होते मात्र त्यांच्याही कुटुंबातील सदस्यांचा कुठलाही संपर्क होत नाही. गाडोदिया परिवार घरासमोर राहतो तर साबू परिवार गांधीबागमध्ये राहत आहे.
कोणी तरी सर्वजण गौरीकुंडमध्ये असल्याचे सांगितले मात्र जो पर्यंत संपर्क होत नाही तोपर्यंत काहीच सांगता येत नाही. नागपूरवरून गेलेले अनेक लोक परत येत आहेत. त्यामुळे ते सुद्धा परत येतील, असा विश्वास आहे. सध्या तरी सर्व देवाच्या भरवश्यावर सोडले असून तोच मला आणि माझ्या परिवाराला हिंमत देत आहे. खेतान परिवाराची एस के. स्टील अ‍ॅन्ड कंपनी असून महेश खेतान मोठय़ा भावासोबत काम करतात.