शेतकऱ्याकडून शेतजमिनीच्या मोजणीसाठी शासकीय फीव्यतिरिक्त ३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील भूमिअभिलेख कार्यालयातील तत्कालीन शिरस्तेदार सलीम बापूलाल शिकलगार यास दोषी धरून येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. भावके यांनी पाच वष्रे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्याची हकिगत अशी, शेणोली (ता. कराड) येथील शेतकरी रामराव कणसे यांनी शेतजमीन खरेदी केली होती. खरेदी केलेल्या शेतजमिनीची मोजणी करून त्यांची गटविभागणीची मोजणी करून त्याची गटविभागणी करण्यासाठी त्यांनी दि. २५ फेब्रुवारी २००८ रोजी येथील भूमिअभिलेख तालुका निरीक्षकांच्या कार्यालयात साडेचार हजार रुपये शासकीय फी भरली होती. या मोजणीसाठी रामराम कणसे व त्यांचे पुत्र सागर कणसे यांनी वेळोवेळी या कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्या वेळी काही कर्मचाऱ्यांनी कणसे पिता-पुत्रांना तत्कालीन शिरस्तेदार सलीम बापूलाल शिकलगार यांची भेट घेण्यास सांगितले. या भेटीत शिकलगार यांनी तातडीने मोजणी करून हवी असेल तर ३ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली. मात्र, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने लाचेची रक्कम देऊ शकत नसल्याचे कणसे यांनी सांगितले. त्या वेळी रक्कम दिल्याशिवाय काम होणार नाही असे शिरस्तेदार शिकलगार याच्याकडून सांगण्यात आले.
त्यामुळे सागर कणसे यांनी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ७ जुलै २००९ रोजी सापळा रचून शिरस्तेदार सलीम शिकलगार यास शासकीय पंचासमक्ष ३ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. या गुन्ह्याचा तपास करून लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीहरि पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. पी. आर. भावके यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे तीन साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्या. भावके यांनी या खटल्यातील आरोपी सलीम शिकलगार यास पाच वष्रे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. श्यामप्रसाद बेगमपुरे, अ‍ॅड. एस. डी. पाटील, अ‍ॅड. ए. वाय. पाटील व अ‍ॅड. एस. एच. मोहिते यांनी काम पाहिले.