कामोठे वसाहतीमध्ये चालणाऱ्या एनएमएमटी बससेवेचे थांब्यांमधील अंतर वाढविणारे राजकीय शक्ती प्रवाशांविरोधात सरसावली आहे. सामान्यांचे तारणहार असा मुखवटा घालून वावरणारे राजकीय नेत्यांचे चेहरे प्रवासीवर्गाच्या विरोधात उतरल्यावर सामाजिक पातळीवर काय परिणाम होऊ शकतात याचा प्रत्यय कामोठेमधील प्रवाशांना पाहायला मिळत आहे. प्रवाशांच्या मतांसोबत स्थानिक रिक्षाचालकांच्या पाठिंब्यासाठी हा खटाटोप पनवेलच्या काही नेत्यांनी सुरू केल्याची माहिती एनएमएमटीच्या विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
पनवेलच्या राजकीय शक्ती सामान्य प्रवाशांसाठी की प्रवाशांची लुटमार करणाऱ्यांसाठी असा प्रश्न कामोठे येथील प्रवाशांना पडला आहे. कामोठे येथील एनएमएमटीच्या प्रवाशांना सात दिवसांत पावने तीन लाखांची तिकीट विक्री व सुमारे ५० हजार प्रवाशांना या बसमधून स्वस्त प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. ही बस सुरळीत चालावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. स्थानिक रिक्षाचालकांच्या विरोधामुळे ही बस सुरू होणार नाही अशी भीती होती, मात्र पोलिसांनी स्थानिक दहशत मोडीत काढत प्रवाशांना प्रवास हक्क कायदा बहाल केल्याचे चित्र कामोठे येथे आहे. मात्र स्थानिक रिक्षाचालकांनी या बससेवेचे थांबे जवळ असल्याने ते लांब असावेत यासाठी एनएमएमटी प्रशासनाकडे मागणी केली होती. ही मागणी एनएमएमटी प्रशासनाने धुडकावून लावली होती. अखेर हे रिक्षाचालक पनवेल तालुक्यातील विविध राजकीय शक्तींच्या जोरावर हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पनवेलच्या एका बडय़ा राजकीय नेत्याने त्यासाठी एनएमएमटीच्या बडय़ा नेत्याला यासाठी संपर्क साधला आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. मात्र शहरी भागात अनेक नेते प्रवाशांसाठी थांबे वाढवून मागतात हे बडेनेते कामोठे येथील प्रवाशांच्या मुळावर उठल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या रिक्षाप्रवासासाठी १० रुपये खर्च होतो तोच प्रवास ५ रुपयांमध्ये एनएमएमटी बसमधून करता येत आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी सामान्यांच्या रोडच्या लुटमारीतून प्रवाशांची सुटका होण्यासाठी आपली शक्ती वापरावी अशी विनंती प्रवासीवर्गातून होत आहे. प्रादेशिक परिवहन विभाग व एनएमएमटी प्रशासनाने काही वर्षांपूर्वी वसाहतीमधील थांब्यांचे सर्वेक्षण केल्यांनतर हे अंतर ठरविले आहेत. त्यामुळे अधिकृत थांब्यांना नष्ट करण्याचा घाट लोकहिताविरोधी असल्याने संताप व्यक्त होत आहे. उलट वाढलेल्या लोकसंख्येमुळे प्रवाशांची थांब्यांमधील अंतर कमी करण्याची मागणी आहे.   

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने कामोठे बससेवा सुरू केल्यानंतर प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे थांब्यामधील अंतर कमी करण्याचे कारण नाही. उलटसरशी लवकरच काही नवीन मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार बस सुरू करणार आहोत. कोणताही राजकीय दबाव एनएमएमटी प्रशासनावर कोणत्याही नेत्यांनी टाकलेला नाही. मला वाटत नाही जनहिताच्या आड कोणते राजकीय शक्ती येईल. तसेच नवी मुंबईतसुद्धा विविध परिवहन समित्यांच्या बस धावतात येथील रिक्षाचालकही व्यवसाय करीत आहेत.  
-गणेश म्हात्रे, सभापती, नवी मुंबई परिवहन समिती