नव्या वर्षांत नवीन घर घेऊ या कल्पनेने सुखावलेल्या सचिन हळदणकर (३८) या सायन येथील तरुणाची नव्या वर्षांची सकाळच मोठी धक्कादायक ठरली. १ जानेवारीच्या सकाळी त्याच्या मोबाइलवर लघुसंदेश थडकले. तब्बल ५० हजार रुपये एटीएममधून काढून घेतल्याचे हे संदेश होते. या संदेशांनी सचिन पुरता हादरला. बदलापूरला घर घेण्यासाठी त्याने पै पै करून साठवलेले पैसे एका रात्रीत चोरीला गेले होते. त्याने दाद मागण्यासाठी बँक आणि पोलिसांकडे धाव घेतली तर तिथेही त्याच्या वाटय़ाला उपेक्षाच आली. स्वतच्या घराचे स्वप्न तर भंगलेच शिवाय उपेक्षा वाटय़ा आली, त्यामुळे हैराण झालेल्या सचिनने आत्महत्या करण्याचा मेलच बँकेला पाठवला. मात्र, तरीही बँकेवर काहीही परिणाम झालेला नाही.
सायन येथे राहणारा सचिन ठाण्यात सेल्समन म्हणून काम करतो. स्वतचे घर असावे यासाठी त्याने मेहनत करून पैसे साठवले. बदलापूरला घरही पाहिले. एक लाख रुपये आगाऊ रक्कमही दिली. पण १ जानेवारीला अचानक त्याच्या बँक ऑफ इंडियाच्या अकाऊंटमधून एटीएमच्या माध्यमातून ५० हजार रुपये काढण्यात आले. माहीम येथील एका एटीएममधून स्कीमरचा वापर करून कोणीतरी हे पैसे काढले. अशा पद्धताने अनेकांचे पैसे काढण्याच्या घटना घडल्या होत्या. बॅंकेने सचिनला पोलीस तक्रार करायला सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा एफआयआर घेतला तर त्वरीत हे पैसे देऊ असे बॅंक ऑफ इंडियाच्या माटुंगा शाखेने सचिनला सांगतिले. त्याने २ जानेवारीला माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेतली. माटुंगा पोलिसांनी त्याला माहीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडल्याने माहीम पोलीस ठाण्यात जाण्यासाठी सांगितले. सचिन माहीम पोलीस ठाण्यात गेला. त्यांनी पुन्हा माटुंग्यात पाठवले. दोन्ही पोलीस ठाणी आपल्यावरची जबाबदारी एकमेकांवर ढकलत होते. तब्बल ४ महिने तो गुन्हा दाखल करण्यासाठी माहीम आणि माटुंगा पोलीस ठाण्यात ये-जा करत होता. एप्रिल महिन्यात पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांना हा प्रकार समजला. त्यांनी लक्ष घातल्याने अखेर १७ एप्रिल २०१४ रोजी माहीम पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आता आपले पैसे मिळतील या आशेने सचिन एफआयआरची प्रत घेऊन बॅंकेत गेला. पण बॅंकनेही त्याला टाळायला सुरवात केली. मेल करा, पुढच्या आठवडय़ात या अशी कारणे देत राहिली. त्यामुळे सचिन अक्षरश रडकुंडीला आला. आम्ही पुढे कागदपत्रे पाठवली आहेत आमच्या हातात काही नाही, असे बॅंक म्हणते. तर थेट रिझव्‍‌र्ह बॅंकेकडे आमची तक्रार करा मग काहीतरी होईळ असा सल्ला  बॅंक व्यवस्थापकाने दिल्याचे सचिन म्हणला. बॅक ऑफ इंडियाचे माटुंगा शाखेचे व्यवस्थापक बी चॅटर्जी यांना संपर्क केला असता प्रक्रिया सुरू आहे असे ते म्हणाले. शाखा काही करू शकत नाही त्याने झोनल ऑफिसच्या कंट्रोलिग विभागाशी संपर्क करावा असे सांगतिले.
   मी सुटी काढून बॅंकेत आणि पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत असतो. पण आता खाजगी कंपनी असल्याने त्यांनी सुटय़ा देणेही बंद केले आहे असे साचिन म्हणाला. गुन्हा दाखल करण्यास सव्वा चार महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर दोन महिने झाले तरी बॅंकेकडून पैशांचा परतावा मिळालेला नाही. गुन्हा दाखल केल्यानंतर एकदाही सचिनला पुन्हा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले नाही. आमचा तपास सुरू आहे, एवढेच माहीम पोलीस सांगत आहे. माझे पैसे नाही मिळाले तर मला आत्महत्या करावी लागेल असा मेलही सचिनने बँकेला पाठवला आहे. पण त्यांच्यावर याचाही काहीच परिणाम झालेला नाही. पोलीस प्रशासन आणि बॅंकेच्या निष्क्रियतेमुळे एका तरुणाची ससेहोलपट होत आहे.