ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ नाशिक (तान) यांच्या वतीने येथे आयोजित ‘हॉलिडे कार्निव्हल २०१५’ मध्ये ५०० पेक्षा अधिक नाशिककरांनी आगामी सहलींची नोंदणी केली असल्याची माहिती तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी दिली.
तीन दिवसांच्या या महोत्सवात सुमारे ३० हजार नाशिककरांनी भेट देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनासाठी उपयुक्त अशा विविध ठिकाणांची माहिती घेतली. शहरातील पर्यटन व्यावसायिकांच्या व्यवसायाला चालना मिळावी तसेच पर्यटकांना एकाच छताखाली विविध संस्थांच्या सहलींची माहिती मिळावी, सहलींचे योग्य प्रकारे नियोजन करता यावे, हा हेतू लक्षात घेऊन या कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यास नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचेही भालेराव यांनी नमूद केले. नाशिककरांनी या कार्निव्हलमध्ये ज्या सहलींनी नोंदणी केली त्यात देशांतर्गत काश्मीर, सिक्कीम, दार्जिलिंग, अंदमान, हिमाचल तर, परदेशांतील सहलींसाठी युरोपला प्रथम पसंती देण्यात आली आहे. यानिमित्ताने कार्निव्हलला भेट देणाऱ्या पर्यटकांमधून सोडत काढण्यात आली. या सोडतीतील यशस्वीतांमध्ये शुभम वॉटर पार्कची सहल- हेमंत मराठे, गणेश भावले, सरिता गोसावी. अॅडलॅब्ज इमेजिका सहल- एस. एम. राठी, रामकृष्ण कंसारा, भंडारदरा सहल- जयेश देवरे, सापुतारा सहल- रुचा संत, हैदराबाद सहल- अशोक तिवारी, कोकण सहल- सुनील पलोड, गोवा सहल- वैशाली श्रृंगारे, कुमारकोत सहल- एस. के. शर्मा, डॉ. महेश दुगडे, संजय पाटेकर, थायलंड सहल- जगदीश आष्टेकर यांचा समावेश आहे.
सोडत प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, मुंजे इन्स्टिटय़ूटच्या दीपाली चांडक, चौधरी यात्रा कंपनीचे ब्रिजमोहन चौधरी हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. कार्निव्हल यशस्वी होण्यासाठी सर्वाचे प्रयत्न कारणीभूत ठरल्याचे भालेराव यांनी नमूद केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 12:09 pm