जिल्ह्यात गतवर्षांत महिला अत्याचाराचे ५१३ गुन्हे दाखल झाले. खुनाचे १९, विनयभंग ५१, बलात्कार ४०, महिला व मुलींचे अपहरण ३९, तर महिलांवरील छळाचे २८९ गुन्हे दाखल झाले. महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येण्याचे प्रमाण ९९.८० टक्के आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. या वर्षभरातील पोलिसांच्या कारभाराचा लेखाजोखा त्यांनी पत्रकारांसमोर मांडला. सरत्या वर्षांत ३५ दरोडे पडले. पकी एका गुन्ह्याचा उलगडा झाला नाही. दरोडय़ात गेलेल्या २ कोटी ४१ लाख ६६ हजार ९४ रुपयांपकी २ कोटी २० लाख ४९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील गुंड, कुप्रवृत्तीच्या ४० व्यक्तींवर हद्दपारीचे प्रस्ताव दाखल झाले. मात्र, यातील किती गुंडांची प्रत्यक्ष हद्दपारी झाली, या बाबत पाटील यांनी काही स्पष्ट केले नाही. वर्षभरात जुगाराचे ५९६ गुन्हे दाखल होऊन ३० लाख रुपये जप्त करण्यात आले. सन २०१२ च्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे, असा दावा त्यांनी केला. दारूबंदीच्या ९१०, तर अवैध प्रवासी वाहतुकीच्या १ हजार ४६१ केसेस असून त्यांच्याकडून १८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
प्रभावी कारवाईमध्ये सेलू येथील रेणुकामाता सोसायटी व कंत्राटदार माधवराव फड यांच्या फार्महाऊसवरील दरोडय़ात मुद्देमालासह दरोडेखोरांना अटक, पोषणआहाराचा काळाबाजार उघडकीस आणण्याच्या घटनांचा समावेश आहे. पाटील स्वत: जास्तीत जास्त वेळ कार्यालयात असतात. रात्री दहा वाजता बिनतारी संदेशाद्वारे जिल्ह्यातील सर्व ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क करतात. जिल्ह्यातील  प्रत्येक खेडय़ात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले. दरोडय़ाच्या गुन्ह्यांत लुटीची मालमत्ता जप्त करण्यात परभणीचा राज्यात प्रथम क्रमांक आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.