जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत ३६ जागांसाठी एकूण ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती. उद्या अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत २ फेब्रुवारी आहे. सर्वच पक्षांनी संख्याबळाच्या ‘कोटय़ा’पेक्षा अधिक अर्ज दाखल केले असले तरी पक्षश्रेष्ठींनी अर्ज मागे घेण्याच्या अर्जावरही सह्य़ा घेतल्या आहेत. मात्र, तरीही काही नाराजांनी परस्पर अर्ज दाखल केले आहेत. अशा नाराजांमुळे पक्षांच्या प्रमुखांची डोकेदुखी वाढणार आहे.
डिपीसीच्या एकूण ४० जागा आहेत. त्यातील नगर महापालिका व श्रीगोंदे पालिका वगळता जिल्हा परिषद, पालिका व शिर्डी परिषदेच्या ३६ जागांसाठी निवडणूक आहे. जि. प. सदस्यांतून सर्वाधिक म्हणजे ३३ जागा, पालिका सदस्यांतून २ व शिर्डी परिषद क्षेत्रातून १ जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यासाठी अनुक्रमे ४६, ५ व २ उमेदवार आहेत. काहींनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी व काँग्रेसने उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र भाजप-सेना युतीचे उमेदवार ठरलेले नाहीत. जि. प.मध्ये दोन अपक्ष व एक कम्युनिस्ट अशा तिघांनी राष्ट्रवादीस सत्तेत पाठिंबा दिला आहे. पक्षीय संख्याबळाप्रमाणे राष्ट्रवादीस १६, काँग्रेसला १२, सेना-भाजपला प्रत्येकी २ व इतरांना १ जागा मिळू शकते.
राष्ट्रवादीचे ठरलेले उमेदवार असे- विठ्ठलराव लंघे, मोनिका राजळे, शाहूराव घुटे, राजेंद्र फाळके, शरद नवले, संभाजी दहातोंडे, शारदा भोरे, ललिता आहेर, योगिता राजळे, मंजुषा गुंड, नंदा वारे, परबत नाईकवाडी, नंदा भुसे, अश्विनी भालदंड, कालिंदी लामखेडे, संगिता गायकवाड. याशिवाय राष्ट्रवादीच्या सुरेखा राजेभोसले, उषा मोटकर व जयश्री दरेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.
काँग्रेसचे ठरलेले उमेदवार असे- बाबासाहेब दिघे, बाळासाहेब हराळ, अण्णासाहेब शेलार, सुनिता भांगरे, निर्मला गुंजाळ, आशा मुरकुटे, सुभाष पाटील, राहुल जगताप, परमवीर पांडुळे, मिरा चकोर, रावसाहेब साबळे व जयश्री डोळस. याव्यतिरिक्त सत्यजित तांबे यांचाही अर्ज आहे.
सेना व भाजपच्या सर्व सदस्यांनी अर्ज दाखल केले. सेनेचे उमेदवार- बाबासाहेब तांबे, चित्रा बर्डे, सुरेखा शेळके, शारदा भिंगारदिवे, दत्तात्रेय सदाफुले व मंदा भोसले. भाजपचे उमेदावर- हर्षदा काकडे, अशोक अहुजा, अंजली काकडे, उज्वला शिरसाट, मंदा गायकवाड व बाजीराव गवारे. याशिवाय राष्ट्रवादीला सत्तेत पाठिंबा देणारे कॉ. आझाद ठुबे व विश्वनाथ कोरडे यांनीही अर्ज दाखल केले आहेत.
पालिका क्षेत्रातून मिनल खांबेकर (२ अर्ज), वैशाली आढाव, अर्जना रावसाहेब व अनिता पोपळघट. शिर्डीतून सविता कोठे व आशा कमलाकर यांचे अर्ज आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संजय बागडे व ज्योती कावरे काम पाहत आहेत.
* जि. प.अध्यक्ष समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत. लंघे यांचा दीड वर्षांचा कालावधी बाकी, परंतु पाच वर्षांच्या नियुक्तीसाठी लंघे यांचा अर्ज.
* काँग्रेसचे सत्यजित तांबे अर्ज ठेवणार की, मागे घेणार?
* बांधकाम सभापती कैलास वाकचौरे वगळता सर्वच जि. प. पदाधिकारी समितीसाठी इच्छूक.
* राष्ट्रवादीच्या मंजुषा गुंड यांचे नाव ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी सुचवले. सुरेखा राजेभोसले यांचे नाव वगळले.
* उषा मोटकर यांचा अर्ज मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न, काँग्रेसचे प्रविण घुले नाराज.
* भाजप, सेनेची नावे अनिश्चित. सर्वच सदस्यांचे अर्ज.