आर्णी शहरातील तालुका क्रीडा संकुलाकरिता राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने ५३ लाख २७ हजाराचा निधी मंजूर केला असल्याची माहिती नगर परिषदेचे उपाध्यक्ष आरीज बेग यांनी ‘लोकसत्ता’जवळ बोलताना दिली. यासाठी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी क्रीडा मंत्रालयसंबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला होता. क्रीडा संकुलाच्या ड्रेनेज व्यवस्था, कंपाऊंड वॉल, बॉस्केटबॉल कोर्ट व स्केटिंग ग्राऊंड, रनिंग ट्रॅक, कबड्डी ग्राऊंड, खो खो ग्राऊंड, सिंथेटिक फ्लोरिंगसाठी वरील निधीचा वापर करण्यात येणार आहे. महिन्याभरात काम सुरू व्हावे, यासाठी मोघे प्रयत्नशील असून त्यांनीच हा निधी खेचून आणल्याचेही बेग यांनी स्पष्ट केले. या निधीमुळे विकास झाल्यानंतर खेळात रुची असणाऱ्यांची संख्या वाढणार असून भविष्यात स्विमिंग पूलसुद्धा आर्णी शहरासाठी व्हावा, अशी मागणी आपण रेटणार असल्याचेही उपनगराध्यक्ष आरीज बेग यांनी सांगितले.