सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंढरपूर शाखेत बनावट सोने खरे असल्याचे भासवून ४४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एच. जोशी यांनी फेटाळून लावला.
    जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंढरपूर शाखेत १६ फेब्रुवारी २०१२ ते १३ ऑगस्ट २०१३ या कालावधीत सोनेतारण कर्ज प्रकरणाशी संबंधित मूल्यनिर्धायक (व्हॅल्युएटर) म्हणून काम पाहणाऱ्या शिरीष कटेकर यांनी भीमा माने (रा. सिध्देवाडी, ता. पंढरपूर), विलास ताड (एकतपूर), गजेंद्र िशदे, संभाजी नागटिळक, भीमराव बावचे, रामचंद्र हाके, बबन बनकर आदींशी संगनमत करून बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून व प्रमाणपत्र देऊन बँकेची ४४ लाखांची फसवणूक केली. अशी फिर्याद बँकेचे शाखाधिकारी पांडुरंग गांडुळे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. या गुन्ह्य़ात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी भीमा माने (रा. सिध्देवाडी, ता. पंढरपूर), विलास ताड (एकतपूर), गजेंद्र िशदे, संभाजी नागटिळक, भीमराव बावचे, रामचंद्र हाके, बबन बनकर या सहा आरोपींनी पंढरपूरच्या सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळला गेल्याने उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.
    या फसवणूक प्रकरणात आपला सहभाग नसल्याचा दावा आरोपींच्या वतीने करण्यात आला. परंतु मुख्य आरोपी कटेकर यानेच सर्व गरव्यवहार केला असून कटेकर याच्या सांगण्यावरून आपण फक्त सह्य़ा केल्याचे आरोपींचे म्हणणे होते. परंतु न्यायालयाने त्यांचा बचाव अमान्य करीत अटकपूर्व जामीन नाकारला. या प्रकरणी मूळ फिर्यादी बँक शाखाधिकारी गांडुळे यांच्यातर्फे अॅड जयदीप माने, सरकारतर्फे अॅड. सौ. ए. ए. माने यांनी बाजू मांडली, तर आरोपींतर्फे अॅड. सारंग आराध्ये यांनी काम पाहिले.