राज्यातील दुष्काळाचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारकडून ६० हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी सुपे येथे बोलताना दिली.
दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्याच्या कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या साखळी पद्घतीच्या सिमेंट बंधाऱ्यांचा लोकार्पण सोहळा पाचपुते यांच्या हस्ते आज सुपे येथे झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जलसंधारण विभागाचे सचिव नारयण कराड, बाजार समितीचे सभापती काशीनाथ दाते, जिल्हा परिषदेचे सदस्य विश्वनाथ कोरडे आदी यावेळी उपस्थित होते.
पाचपुते पुढे म्हणाले, दुष्काळी परिस्थितीतील लोकांना रोजगार मिळवून देण्याच्या निमित्ताने राज्यात, जिल्हयात तलावातील गाळ उपसणे, साखळी पद्घतीचे बंधारे उभारणे अशी दुष्काळाचे कायमस्वरूपी उच्चाटन करणारी कामे मोठय़ाद प्रमाणावर झाली आहेत. राज्यात सर्वात जास्त बंधारे पारनेर तालुक्यात झाले असून १६ कोटी ५० लाख रूपये खर्चून १७२ बंधारे उभरण्यात येणार आहेत. त्यापैकी १६३ बंधारे पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले. या बंधाऱ्यांमध्ये २ हजार २६५ दशलक्ष घनफूट पाणी अडविले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
केंद्र सरकाकडून दुष्काळ निर्मूलनासाठी मिळणाऱ्या ६० हजार कोटींचा निधी पाणलोटक्षेत्र विकास साखळी पद्घतीचे सिमेट बंधारे आदी कामांसाठी उपयोगात आणण्यात येणार असल्याचेही पाचपुते यांनी यावेळी बोलताना सांगितले.