‘लंबोदर’ गणरायाच्या नवेद्यासाठी मुंबईत फळांची, भाज्यांची आवक दुपटीने वाढली आहे. नवी मुंबईच्या बाजारात दिवसाला तब्बल ६,५०० क्विंटल केळी आणि ६,००० क्विंटल सफरचंद दाखल होत असून गणेशोत्सवाच्या दिवसात ही आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी थर्माकोलपेक्षा फुलांच्या आराशीला महत्त्व आल्याने फुलबाजारातही तेजीचे वातावरण आहे. आवक वाढल्याने ग्राहकांनाही महागाईच्या दिवसात दिलासा मिळेल.
पावसाने एक महिना विश्रांती घेतल्याने फुलबाजारात झेंडू व शेवंती या फुलांची आवक वाढणार आहे. मात्र गणेशोत्सवासाठी दोन दिवस आधी फुले येत असल्याने तसेच फुलांच्या बाजारपेठेचे विक्रेंदीकरण झाल्याने किंमती व आवक याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही, असे दादर फुलबाजारातील व्यापारी सोपान दुराफे यांनी सांगितले. सध्या दादरमध्ये दिवसाला तीन टन झेंडू आणि एक टन शेवंती दाखल होते. झेंडूचा दर ३० रुपये किलो तर शेवंतीचा दर १०० रुपये किलो आहे. बोरिवली, ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथेही फुलांच्या बाजारपेठा असून मागणी तसेच पुरवठा यांच्या गणितानुसार फुलांच्या किंमती ठरतील, असे ते म्हणाले. सजावटीसाठी जरबेरा, कान्रेशियन, गुलछडी या फुलांना मागणी आहे. गणेशोत्सवाच्याच्या काळात मागणी वाढत असल्याने सात सप्टेंबरपासून ही फुले बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्याचप्रमाणे गणेश प्रतिष्ठापनेसाठी लागणारया २१ पत्रींचीही भुलेश्वर बाजारात मोठय़ा प्रमाणात आवक होईल.
ऑगस्टमध्ये दरदिवशी दोन ते अडीच हजार क्विंटलमध्ये येत असलेल्या सफरचंदाची आवक गेल्या तीन दिवसात दुपटीहून अधिक झाली आहे. गणेशोत्सव काळात ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. काश्मीर तसेच सिमला परिसरात सफरचंदांचे उत्पादन मुबलक झाले आहे. ही सफरचंदे मुंबई येत असल्याने आवकही वाढली आहे आणि किंमतीही खाली आल्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असा विचार करून शेतकरी उत्पादन घेत असल्याने या काळात बाजारात तेजी येते आणि आवक वाढल्याने किंमती नियंत्रणात राहतात, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले. चांगल्या प्रतीची सफरचंद सध्या ६० ते ८० रुपये किलो मिळत आहेत.
गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या महिन्यात मुंबईत तब्बल १.३२ लाख िक्वटल केळी आली होती. यावर्षी त्यात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये ८३ हजार क्विंटल, जुलमध्ये १.२८ लाख िक्वटल तर ऑगस्टमध्ये साधारण १.४० लाख क्विंटल केळी दाखल झाली आहेत. गणेशोत्सवात सकाळ संध्याकाळ नवेद्यासाठी लागणारी केळी सर्वसामान्यांना परवडणारी असतात. यंदा चांगला पाऊस झाल्याने केळीचे उत्पादनही वाढले आहे. हिरव्या सालीच्या केळ्यांची जागा गोल्डन केळ्यांनी घेतली आहे, असे सचिव अविनाश पाटील म्हणाले.
दरदिवशी होत असलेली आवक-
सफरचंद – ६००० क्विंटल
केळी – ६५०० क्विंटल
पपई – १६०० क्विंटल
सीताफळ – २०० क्विंटल
मोसंबी – ३१०० क्विंटल
संत्रे – ४१६ क्विंटल
फुले
झेंडू – ३० टन
शेवंती – ४ टन
१ क्विंटल – १०० किलो
१ टन – १००० किलो.