मुंबईतील बहुतेक पंचतारांकित रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन मिळत असून मोठय़ा प्रमाणात हंगामी कामागारांना वर्षांनुवर्षे सेवेत कायम केले जात नाही. जसलोक रुग्णालयातील कामगारांच्या अंतर्गत संघटनेने व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करून सुमारे १८ वर्षे बदली काम करणाऱ्या ६३ कामगारांना सेवेत कायम केले. मात्र अद्यापि सुमारे साडेतीनशे कामगार ८ वर्षे बदली कामगार म्हणून राबत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जसलोक हॉस्पिटल कामगार संघटनेचे अध्यक्ष सिकंदर आढाव, सचिव रमेश चव्हाण भाणजी सोंधरवा आदींनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करून ६३ कामगारांना कायम सेवेत घेण्यात यश मिळवले. १ एप्रिल २०१३ पासून या कामगारांना कायम सेवेची संधी मिळाली आहे. या कामगारांना कायम सेवेत १३ हजार रुपये वेतनावर सामावून घेण्यात आले.
कायम सेवेतील बहुतेक कामगार  व कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन मिळत असल्याचे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रुग्णालयाची एकूण उलाढाल व रुग्णांची संख्या लक्षात घेऊनच ८ ते १८ वर्षे बदली कामगार ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित साडेतीनशे कामगारांना कायम सेवेत घेण्यासाठीही लढा दिला जाईल, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जसलोक रुग्णालयात सुमारे साडेआठशे कर्मचारी-कामगार काम करत असून रुग्णालयाच्या नफ्यातील ठोस हिस्सा कामगारांना वेतनवाढीपोटी मिळाला पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली.