31 October 2020

News Flash

पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात सरासरी ६३ टक्के पाणीसाठा

पश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठवण प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असून, कोयना, वारणा या मोठय़ा तसेच भाटघर व दूधगंगा यासह अन्य मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांत आजअखेर सरासरी ६३ टक्के पाणीसाठा

| July 13, 2013 01:59 am

पश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठवण प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असून, कोयना, वारणा या मोठय़ा तसेच भाटघर व दूधगंगा यासह अन्य मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांत आजअखेर सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात सर्वाधिक पाणीसाठा तारळी प्रकल्पात ८०.१७ टक्के पाठोपाठ राधानगरी प्रकल्पात ७०.२१, तर बलाढय़ कोयना जलविद्युत प्रकल्पात ६९.२२ टक्के पाणीसाठा आहे. पुणे जिल्ह्यातील वीर प्रकल्पात सर्वात कमी ३५.६८ टक्के पाणीसाठा आहे. काही प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याची आकडेवारी सांगली पाटबंधारे विभागाने दिली.
यंदा पाऊसमान उत्तम असले तरी गतवर्षी मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठवण प्रकल्पात चिंताजनक असा २५.५ टक्के पाणीसाठा राहिला होता. सरासरीच्या तुलनेत नीचांकी पाऊस झाल्याने सर्वच पाणीसाठवण प्रकल्पांची पाणीपातळी तळ गाठून राहताना, पावसाची ओढ कायम राहिल्याने पाणी व वीजटंचाईचे मोठे संकट उभे ठाकल्याची चिंताजनक स्थिती होती. सर्वत्र पेरण्यांची कामे खोळंबली होती. याउलट सध्या सततच्या पावसामुळे पेरण्यांच्या कामात व्यत्यय येत असून, सर्वच लहानमोठय़ा पाणीसाठवण प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.
आज दिवसभर कोयना धरणक्षेत्रासह धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत आहे. दिवसभरात धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात ४५ एकूण २,१६७, नवजा विभागात ७० एकूण २,५४२ तर महाबळेश्वर विभागात ७५ एकूण २,२७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत नवजा विभागात १८६ मि.मी. धो धो पाऊस झाला आहे. दरम्यान, कोसळलेला एकंदर पाऊस गतवर्षीच्या तुलनेत सव्वादोनपटीने जादा आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख १२ प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता  सुमारे २६१ टीएमसी आहे. त्यात सध्या १६४ टीएमसी म्हणजेच ६२.६३ टक्के पाणीसाठा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्पात असलेला सध्याचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे- पाणीसाठा टीएमसीमध्ये तर कंसात त्याची टक्केवारी- कोयना जलसागर ७२.८६ (६९.२२) वारणा २४.०६ (६९.९४), दूधगंगा १४.६५ (५७.६८), राधानगरी ५.८७ (७०.२१), धोम ६.४३ (४७.६३), कण्हेर ५.८१ (५७.५२), उरमोडी ६.३९(६६.२८), तारळी ४.६९ (८०.१७), धोम बलकवडी १.७९ (४३.३१), पुणे जिल्ह्यातील वीर ३.४४ (३५.६८) नीरा देवघर ५.५३ (४७.१८), भाटघर १२.४१ (५२.८०). आज सकाळी ८ वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील पावसाची तालुकानिहाय सरासरी व कंसात एकूण पाऊस- सातारा १६.४ (३४१.७), जावली २५.४ (६६३.२), कोरेगाव ५.४ (१७५.४), फलटण ६ (११५.३), माण ६.२ (८३.९), खटाव १०.१(१३२.६), वाई १०.६(३४४.२), महाबळेश्वर ४६.५ (९३०.१) तर खंडाळा तालुक्यात ५.६ एकूण २०४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, दुष्काळी भागात अपेक्षित पाऊसमान झालेले नसून, उर्वरित हंगामात येथे पावसाची स्थिती कशी राहते यावर येथील पिण्याच्या व नित्याच्या वापराच्या पाण्याची मागणी अवलंबून राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 1:59 am

Web Title: 63 water level in western maharashtra project
Next Stories
1 मोहोळजवळ औदुंबर पाटील साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन पेटले
2 राज्यातील आदर्श बसस्थानक कराडमध्ये साकारणार
3 गजाननमहाराजांच्या पालखी सोहळय़ाचे सोलापुरात भक्तिमय वातावरणात स्वागत
Just Now!
X