News Flash

आर्णीत आजपासून विदर्भ साहित्य संमेलन, रसिकांची गर्दी उसळणार!

आर्णी येथील नागरी आयोजन समिती व विदर्भ साहित्य संघ, तसेच आर्णी नगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक साहित्यनगरी तिर्थरूप मंगल कार्यालयात उद्या, २१ ते

| February 21, 2014 02:39 am

आर्णी येथील नागरी आयोजन समिती व विदर्भ साहित्य संघ, तसेच आर्णी नगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक साहित्यनगरी तिर्थरूप मंगल कार्यालयात उद्या, २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत  ६३ व्या विदर्भ साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वहाऱ्डी कवी शंकर बडे राहणार असल्याची माहिती या संमेलनाचे संयोजक आर्णीचे उपनगराध्यक्ष आरिज बेग यांनी दिली.
या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे भूषविणार असल्याची माहिती संयोजकांनी याप्रसंगी दिली. उद्या, २१ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमित देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार, डॉ.किशोर सानप, माजी.आमदार अण्णासाहेब पारवेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे व प्रा.नारायण कुलकर्णी कवठेकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रात राजा बढे स्फुर्ती कवी संमेलन होणार आहे. यात विदर्भातील दिग्गज कवी हजेरी लावणार असून २२ फेब्रुवारीला तिसरे सत्र सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला मराठी चित्रपट अभिनेता सिध्दार्थ जाधव उपस्थित राहणार आहे.
ज्येष्ठ वऱ्हाडी कवी प्रा. विठ्ठल वाघ या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून राहणार आहेत. चवथ्या सत्रात कवी संमेलन, पाचव्या सत्रात ‘साहित्याची भूमिका आणि शेतकऱ्यांचे प्रश्न’ यावर परिसंवाद होणार असून सहाव्या सत्रात ‘अंधश्रध्दा निर्मूलन विचारवंतांची भूमिका’ या विषयावर डॉ.शाम मानव यांचा परिसंवाद आयोजित असुन, सातव्या सत्रात रात्री ८ वाजता ‘झोळी’ नाटय़प्रयोग व ‘अश्वत्थामा’ हा एकपात्री प्रयोग होईल. २३ फेब्रुवारीला आठव्या सत्रात सकाळी १० वाजता ‘महिला सक्षमीकरण- दशा आणि दिशा’ या विषयांवर परिसंवाद, नवव्या सत्रात दुपारी १२ वाजता कथाकथन, दहाव्या सत्रात डॉ.मिर्झा रफी अहेमद बेग (मिर्झा एक्स्प्रेस) व किशोर बळी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. अकराव्या सत्रात समारोपीय कार्यक्रमात पुस्तकांचे प्रकाशन, तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, नाणे प्रदर्शन, वृक्षप्रदर्शन राहणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या साहित्य प्रेमींसाठी अल्प दरात भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील साहित्यप्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजन समितीने केले असून आर्णी येथे विदर्भ साहित्य संमेलनाची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली असून मोठय़ा संख्येने साहित्यिकांची गर्दी आर्णीकरांना प्रथमच पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुधाकर कदम अदखल
आर्णी येथील मराठी गझागायक सुधाकर कदम हे सध्या पुणे येथे असून त्यांच्या नावाची साधी दखलही निमंत्रण पत्रिकेत घेण्यात आली नसल्याने त्यावर उलटसुलट चर्चा होतांना दिसत आहे. सुधाकर कदम हे साहित्यिक नसल्याचा जावईशोध काही मंडळींनी लावल्याने त्यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान मिळाले नाही, अशी एकंदरीत चर्चा आहे. या संदर्भात साहित्य संमेलनाचे संयोजकांशी संपर्क साधला असता सुधाकर कदम हे आर्णीच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब असली तरी आमच्याकडून त्यांचे नाव नजरचुकीने निमंत्रक पत्रिकेत आले नाही, याची खंत असल्याचे लोकसत्ताशी बोलतांना कबूल केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 2:39 am

Web Title: 63rd vidarbha literary meet at arni from feb 21
Next Stories
1 सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी प्रयत्न करावे -न्या. गवई
2 ‘काँग्रेस व शिवसेनेचे पानिपत करा’
3 पिस्तुल हाताळताना गोळी सुटल्याने शिपाई ठार
Just Now!
X