बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील दहा जिल्ह्य़ात ६४.६५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत महिला व युवकांमध्ये कमालीचा उत्साह होता. प्रत्येक जिल्ह्य़ात शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक मतदान झाले. आता रविवारी मतमोजणी होणार असून उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील सहा विधानसभा मतदारसंघात ६६.२६ टक्के मतदान झाले असून चंद्रपूर मतदारसंघ वगळता ब्रम्हपुरी, चिमूर येथे ७४ टक्क्यांवर व राजुरात ७० टक्क्यांवर मतदान झाल्याने शहराऐवजी ग्रामीण मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. ब्रम्हपुरी आणि चिमूर या दोन विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ब्रम्हपुरी ७४.८७, चिमूर ७४.५५ टक्के मतदान झाले. ग्रामीण भाग असताना तेथील मतदारांमध्ये उत्साह होता. राजुरा मतदारसंघात ७०.८० टक्के मतदान झाले. येथे लोकसभेत ६८.८७ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे येथेही केवळ दोन टक्के मते वाढली आहेत, तर बल्लारपूर ६३.१८ व वरोरा ६४.८१ टक्के मतदान झाले. लोकसभेत येथे अनुक्रमे ६१.३१ व ६२.७६ टक्के मतदान झाले होते.
नागपूर जिल्ह्य़ातील बाराही मतदारसंघात ६०.११ टक्के मतदान झाले असून मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ४.३० टक्के एवढी ही वाढ आहे. सर्वाधिक मतदान काटोल मतदारसंघामध्ये ७०.३८ टक्के तर त्या खालोखाल ६८.९१ सावनेर मतदारसंघात व रामटेक मतदारसंघात ६८.६१ टक्के झाले. ६५.९९ टक्के हिंगणा मतदारसंघात, ६५.८१ टक्के उमरेड मतदारसंघात, ६२.२५ टक्के कामठी मतदारसंघात, ५६.२२ टक्के दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात, ५६.२८ टक्के पूर्व नागपूर मतदारसंघात, ५५.१२ टक्के मध्य नागपूर मतदारसंघात, ५३.५५ टक्के उत्तर नागपूर मतदारसंघात, दक्षिण नागपूर मतदारसंघात ५३.२२ टक्के तर पश्चिम नागपूर मतदारसंघात ५२.१४ टक्के मतदान झाले. इतर मतदारांची संख्या ५३ असूनही त्यांच्यापैकी कुणीच मतदान केले नाही.
 यवतमाळ जिल्ह्य़ातील सातही विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी झालेल्या मतदानात ६६.०२ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक टक्केवारी वणी मतदारसंघाने गाठली असून ७२.६७ टक्के, तर सर्वात कमी टक्केवारी यवतमाळची (५८.६७4 टक्के) आहे. आर्णीत ६९.११, दिग्रस ६७.८८, राळेगाव ६७.४०, उमरखेड ६७.०२, पुसद ६१.२३ टक्के मतदान झाले. जिल्ह्य़ात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी आल्याने  मतदानाचा ओघ थंडावला होता. जिल्ह्य़ात २० लाख २५ हजार ९१८ मतदार आहेत. जिल्ह्य़ात २ हजार ३३६ केंद्रांवर मतदान घेण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची अंतिम टक्केवारी ६४.११ टक्के असून गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी दोन टक्क्यांनी मतदान वाढले आहे. अंतिम आकडेवारीनुसार धामणगाव मतदारसंघात ६८.३७ टक्के, बडनेरात ५६.०८ टक्के, अमरावती ५५.७४ टक्के, तिवसा ६२.८२ टक्के, दर्यापूर ६४.६४ टक्के, मेळघाट ६८.०३ टक्के, अचलपूर ७०.३७, तर मोर्शी मतदारसंघात ६९.०७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ात ६४.४८ टक्के सरासरी मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, जिल्ह्य़ातील १०१ उमेदवारांचे भाग्य इव्हिएम मशिनमध्ये बंद झाले आहे. मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारीनुसार मलकापूर ६६.३६, बुलढाणा ५९.८०, चिखली ६७.६६, जळगांव जामोद ५९.६५, खामगाव ७३, मेहकर ५९.८५, तर सिंदखेडराजा ६४.५९ टक्के मतदान झाले असून एकू ण टक्केवारी ६५ टक्के आहे. या निवणुकीसाठी १८ लाख ७९ हजार १३६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
वाशीम जिल्ह्य़ात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. यामध्ये वाशीम विधानसभा मतदारसंघात ५८ टक्के, रिसोड मतदारसंघात ६४ टक्के तर कारंजालाड मतदारसंघात ६५ टक्के मतदान झाले.
वर्धा जिल्ह्य़ातील चारही मतदारसंघातील मतदानाची एकूण सरासरी ६६ टक्के असून हिंगणघाट मतदारसंघात विक्रमी मतदान झाल्याची नोंद आहे. वर्धा मतदारसंघात २ लाख ८३ हजार मतदारांपैकी १ लाख ६४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बचावला. एकूण ५५ टक्के नोंद असून पुरूषांचे प्रमाण ६० टक्के तर महिलांचे ५५ टक्के प्रमाण आहे. हिंगणघाटमधील २ लाख ६० हजार मतदारांपैकी १ लाख ८७ हजार मतदारांनी हक्क बजावला असून टक्केवारी ७१.७५ टक्के एवढी आहे. देवळीत २ लाख ४७ हजार पैकी १ लाख ६८ हजार एवढे मतदान झाले असून टक्केवारी ६७ टक्के आहे. आर्वीत ६८ टक्के मतदान झाले.
अकोला जिल्ह्य़ात ५६.१८ टक्के मतदान झाले. जिल्ह्य़ाच्या सरासरीने साठीही गाठली नाही. अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्य़ात सर्वाधिक मतदान अकोट मतदारसंघात झाले असून त्याचे प्रमाण ६०.७१ टक्के, तर बाळापूर येथे ५९.९५ टक्के, अकोला पश्चिममध्ये सर्वात कमी ५१.५७, अकोला पूर्वमध्ये ५५.७८, मूर्तिजापूर मतदारसंघात ५३.१० टक्के मतदान झाले. याची सरासरी ५६.१८ टक्के आहे.
गोंदिया जिल्ह्य़ातील चार मतदारसंघात ६९.११ टक्के, तर भंडारा जिल्ह्य़ातील तीन मतदारसंघात ७०.९७ टक्के मतदान झाले. यात गोंदिया, अर्जुनी मोरगाव, तिरोडा व आमगाव-देवरी, तर भंडारा जिल्ह्य़ाातील भंडारा, साकोली व तुमसर मतदारसंघाचा समावेश आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघात ६६.२३, अर्जुनी मोरगाव सर्वाधिक ७१.४६, तिरोडा ६९.७५ टक्के, तर नक्षलवादग्रस्त आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातही ६९.६२ टक्के मतदान झाले. भंडारा जिल्ह्य़ातील अनुसूचित जातीकरिता राखीव भंडारा विधानसभा मतदारसंघात ६८.२२, तुमसर विधानसभा मतदारसंघात ७१.४४, तर साकोली विधानसभेत सर्वाधिक ७३.७० टक्के मतदान झाले.
गडचिरोलीत जिल्हय़ातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी विधानसभा मतदारसंघात ६६.१६ टक्के मतदान झाले आहे. आरमोरीत २ लाख ३८ हजार ६९२ मतदारांपैकी १ लाख ७१ हजार ६१४ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७१.९० आहे. यामध्ये ८१ हजार ८५५ महिला व ८९ हजार ७५९ पुरूष आहेत. महिलांची टक्केवारी ७०.३३ तर पुरूषांची ७३.३९ इतकी आहे. गडचिरोली विधानसभा मतदारसंघात ५८.२४ टक्के मतदान झाले. येथे २ लाख ७७ हजार १०० मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ६१ हजार ३७० मतदारांनी मतदान केले. महिला ७५ हजार ३३७ आहेत. तर ८६ हजार ३३ पुरुषांनी मतदान केले. टक्केवारीत महिला ५६ टक्के तर पुरूष ६०.१५ टक्के आहेत. अहेरी मतदारसंघात ७०.०१ टक्के मतदान झाले. एकूण २ लाख २७ हजार ९४६ मतदारांपैकी १ लाख ५० हजार ७४८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ७० हजार ७५४ महिला तर ७९ हजार ९९४ पुरूष आहेत. ६७.६५ टक्के महिला तर ७२.२५ टक्के पुरुषांनी मतदान केले.

जिल्हानिहाय मतदान
नागपूर – ६०.११, अमरावती – ६४.११
चंद्रपूर -६६.२६, गडचिरोली – ६६.१६
वर्धा- ६६.४८, भंडारा – ७०.९७, गोंदिया -६९.००, यवतमाळ -६६.०२, वाशीम -६१.०३,
अकोला –  ५६.१८, बुलढाणा – ६६.४०