गुरूवारी मुंब्य्रात एका शाळकरी विद्यार्थ्यांला भटक्या कुत्र्यांच्या एका टोळीने जबर जखमी केल्यानंतर या प्रश्नाचे गांभीर्य पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले असून महापालिका प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिका क्षेत्रात सध्या सुमारे ६५ हजार भटकी कुत्री असून निर्बीजीकरण योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीअभावी त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एक कुत्री वर्षभरात साधारणत: १२ पिल्ले देते आणि त्यातील सहा जगतात. त्यांचे हे प्रजनन रोखले नाही, तर २०२० पर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रात २७ लाख भटकी कुत्री असतील, अशी माहिती भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सत्यजित शहा यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सध्या सुमारे २० लाख आहे. त्याच्याशी तुलना करता प्रत्येक ३० नागरिकांमागे एक भटका कुत्रा आहे.  
रस्त्यांवर, वस्त्यांमधील गल्ल्यांमध्ये भटकत राहणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांना ये-जा करणे मुश्कील होऊ लागले आहे. रात्र तर या कुत्र्यांना आंदणच दिल्यासारखी असते. भटके कुत्रे रात्री येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांवर भुंकतात. त्यांच्या अंगावर धावून जातात आणि चावतात. सायकल अथवा दुचाकीस्वारांचा पाठलाग करतात. त्यामुळे घाबरून अपघात होण्याचे प्रकार घडतात. प्रामुख्याने लहान मुले या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरतात. महिला आणि वृद्धांनाही त्यांचा फटका बसतो. ठाणे शहराप्रमाणे जिल्ह्य़ात सर्वत्रच भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. गेल्या वर्षी जिल्ह्य़ात ११ हजार जणांना कुत्रा चावल्याची नोंद झाली आहे. त्यातील २ हजार ६६८ ठाणेकर होते. कुत्रा चावल्यामुळे त्वरित रॅबिज प्रतिबंधक इंजेक्शन घ्यावे लागते. ते जवळील आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असेलच याची शाश्वती नसते. कुत्रा चावल्यामुळे होणारा रॅबिज हा अत्यंत जीवघेणा आजार असून अशा रुग्णांची मरणानेच सुटका होते.
निवारा केंद्र कागदावरच
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निवारा केंद्र उभारण्याचे आदेश न्यायालयाने संबंधित प्राधिकरणांना दिले आहेत. मात्र अद्याप निवारा केंद्राची योजना कागदावरच आहे. ठाण्यात तर मध्यंतरीच्या काळात तब्बल दीड वर्ष निर्बीजीकरण प्रक्रियाच बंद होती. तीन महिन्यांपूर्वी ती पुन्हा कार्यान्वित झाली असली तरी ती फारशी परिणामकारक नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात महापालिका श्वान नियंत्रण कक्षात वारंवार संपर्क साधूनही माहिती मिळू शकली नाही.
‘त्या’ विद्यार्थ्यांला महापालिका करणार मदत
भटक्या कुत्र्यांच्या चाव्याने गंभीर जखमी झालेल्या मुंब्रा येथील साहिद सय्यद या नऊ वर्षीय मुलाच्या उपचारांचा सर्व खर्च महापालिकेच्या वतीने करण्याचे आदेश महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी शुक्रवारी महासभेदरम्यान प्रशासनाला दिले. या मुलाच्या वैद्यकीय खर्चापोटी एक लाख रुपये देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते नरेश म्हस्के आणि विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी मांडला होता. या प्रस्तावावर सांगोपांग चर्चा होऊन तो मंजूर करण्यात आला.