मुंबईत भटक्या कुत्र्यांची समस्या भयावह होत असून भटकी कुत्री चावण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झालेली नाही. गेल्या वर्षी मुंबईत सुमारे ६८ हजार लोकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत जागोजागी भटकी कुत्री आढळतात. रात्री तर रस्त्यावर या भटक्या कुत्र्यांचेच साम्राज्य असते. अशी कुत्री चावण्याचे प्रमाणही वाढत आहे. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०१३ या एका वर्षांत तब्बल ६७,७७९ लोकांना कुत्रे चावल्याच्या घटनांची नोंद झाली आहे.
अर्थाथ मुंबईच्या आसपास विरार, कल्याण, डोंबिवली, पनवेल, कर्जत, कसारा या परिघातील ही आकडेवारी आहे. मात्र त्यांनी मुंबईत उपचार केल्याने मुंबईत त्याची नोद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या श्वानदंशामुळे ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
२०१२ या वर्षांत ८२,२८४ जणांना श्वानदंश झाला होता. त्यात ८ जण दगावले होते. श्वानदशांमुळे गंभीर दुखापत होण्याच्या घटनांतही वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये धारावी येथील एका चिमुकलीला कुत्रा चावल्याने तिला आपला एक कान गमवावा लागला होता. तर मुंबईतील एका शिकाऊ डॉक्टरला नाशिक येथे कुत्रा चावल्याने त्याच्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली होती.
श्वानदंशाची समस्या मुंबईबरोबरच बाहेरही तशीच अक्राळविक्राळ आहे. पालिका भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरणासारखे काही उपाय करत असते. मात्र त्यातून फारसे काही साध्य होत नाही. कुत्रे चावण्याच्या बहुतांश घटना रात्री घडतात. कुत्र्यांना दगड मारणे, छळ करणे आदी प्रकारामुळे ते पिसाळतात आणि चावतात, असे आरोग्य विभागाने सांगितले