शासनाची कोणतीही मदत न घेता आदिवासींच्या उन्नत्तीसाठी झपाटून काम करणाऱ्या शबरी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षभरात आदिवासी गाव, पाडय़ांमधील ६८७ बालके कुपोषणापासून मुक्त केली आहेत. आदिवासी महिला, पुरुष, मुलांच्या प्रगतीसाठी शबरी सेवा समितीने वर्षभरात आरोग्यविषयक, शैक्षणिक, जनजागृतीविषयक कार्यक्रम राबविले. या उपक्रमांचा ८ हजार २३७ आदिवासी बांधवांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती शबरी सेवा समितीचे सचिव प्रमोद करंदीकर यांनी दिली.
गेल्या दहा वर्षांपासून शबरी सेवा समितीचे कार्यकर्ते राज्याच्या विविध भागांतील आदिवासी भागाची निवड करतात. तेथे आदिवासींचे समाजजीवन बदलणे, त्यांच्यामधील अंधश्रद्धा दूर करणे, त्यांना कुपोषणापासून मुक्त करणे असे उपक्रम राबवितात. समितीचे अध्यक्ष निवृत्त सनदी अधिकारी गिरीश गोखले, डॉ. निळकंठ फडके, नितीन आठल्ये, प्रमोद करंदीकर व इतर सहयोगी कार्यकर्ते हा उपक्रम नित्यनेमाने राबवितात. दानशूरांच्या सहकार्याने आदिवासी विकासाचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी शासनाकडून एक पैशाचीही मदत घेण्यात येत नाही, असे करंदीकर यांनी सांगितले. धडगाव तालुक्यातील पिंपळखुटा, वरखंडी, कर्जतमधील खांजण, खोंडेवाडी, नागेवाडी अशा १२ आदिवासी भागांतील ६८७ आदिवासी बालकांना गेल्या वर्षभरात कुपोषणमुक्त करण्यात आले आहे. या भागातील बहुतांशी मुले कुपोषणग्रस्त होती. त्यांना पोषणआहार सुरू केला. त्यांना वेळीच वैद्यकीय उपचार करण्यात आले. ३४ ठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्याचा लाभ सुमारे तीन हजार महिला, मुलांनी घेतला. ७४८ रुग्णांवर नागरी रुग्णालयात उपचार करून घेण्यात आले. ३९६ रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. व्याधीग्रस्त १७ मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मोतीबिंदू, दंतशिबिरे भरवून ४०० आदिवासी नागरिकांनी लाभ घेतला. तीन हजार शाळकरी विद्यार्थ्यांना वह्य़ा, पुस्तके वाटप केली. त्यांच्यासाठी चित्रकला, निबंध, गायन स्पर्धा घेण्यात आल्या. तीन मुलींना दत्तक घेण्यात आले, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. डोंबिवली परिसरातील ४० तरुण मुलांचा एक गट ‘यंग ब्रिगेड’ नावाने शबरी सेवेच्या कार्याला मदत करतो. या गटाकडून आर्थिक मदत जमा करून ती समितीच्या कार्यासाठी देण्यात येते. दरमहा हे काम चालते. ठाणे, मुंबई, रायगड परिसरातील २३ सामाजिक संस्था शबरीच्या कार्याला हातभार लावीत आहेत. याच भागातील सुमारे दीडशे ते दोनशे दानशूर मंडळी नियमितपणे शबरीच्या कार्यातील आपल्या सेवेचा वाटा उचलत आहेत.