फिरत्या लोकन्यायालयाच्या चमूने मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन अपंग आरोपी व अंथरुणाला खिळलेल्या तक्रारदारांच्या दारी जाऊन न्याय दिला. भावाभावात असलेले वाद पॅनल न्यायाधीशांसमक्ष संपुष्टात आले. शनिवारी अखेरच्या दिवशी एकूण ६९५ प्रकरणे निकाली निघाली. शहरात या न्यायालयीन चमूला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
फिरते लोकन्यायालय अपंग असलेला आरोपी बाल्या माटे यांच्या दारी गेले व १९९३ पासून असलेल्या जुन्या वादाचा निपटारा केला. फिर्यादी गिरीश ठाकरे यांनी शेषराव पवार यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती. तक्रारकर्ता अंथरुणाला खिळलेला असल्याचे चमूला कळल्यावर चमूचे वाहन सुभेदार लेआऊट येथे त्यांच्या राहत्या घरी पोहचले आणि प्रकरणाचा निवाडा केला. अशोक व मोरेश्वर या दोन भावातील वाद चमूने निकाली काढला. शेवटच्या दिवशी शनिवारी चमू मध्यवर्ती कारागृहात पोहचली व आरोपींशी संवाद साधला. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी कैद्यांना प्ली बार्गेनिंगच्या संकल्पनेवर माहिती दिली. अ‍ॅड. एस.आर. गायकवाड यांनी कैद्यांना मोफत कायदेविषयक सल्ला दिला. या चमूला शाळकरी मुलांनीही भेट दिली. निवृत्त न्यायाधीश डब्ल्यू.व्ही. गुघाणे, अ‍ॅड. एस.आर. गायकवाड. अ‍ॅड. विजय देशपांडे यांच्या पॅनलद्वारे ६९५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी न्यायिक अधिकारी एन.एच. जाधव, अ‍ॅड. नामदेवराव गव्हाळे, सुनील दावडा यांनी आपली सेवा दिली.