सोलापूर विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बाराव्या पंचवार्षकि योजनेतून प्राथमिक टप्प्यात सात कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्याबाबतची माहिती विद्यापीठ आयोगाने पत्राद्वारे कळविल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी सांगितले.
एकमेव सोलापूर जिल्हय़ापुरते कार्यक्षेत्र असलेल्या सोलापूर विद्यापीठास गेल्या २३ मे रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ‘१२ ब’ची मान्यता मिळाली होती. त्यानंतर प्रथमच विद्यापीठाने, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बाराव्या पंचवार्षकि योजनेतून निधी मिळण्यासाठी गेल्या ऑगस्टमध्ये शेवटच्या आठवडय़ात प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावातून प्राथमिक टप्प्यात सात कोटींचा निधी मंजूर झाल्याचे कुलगुरू डॉ. मालदार यांनी सांगितले.
या निधीतून विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सोयीसुविधा, पुस्तके, जर्नल्स, प्रयोगशाळा साहित्य व उपक्रम प्राध्यापकांसाठी प्रवास अनुदान, परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन, महिलांसाठी पायाभूत सुविधा आदी विविध कामे केली जाणार आहेत. विद्यापीठ आयोगाकडून प्राथमिक टप्प्यात प्रथमच निधी मिळाल्याने सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ अनुदान आयोगाव्यतिरिक्त असणाऱ्या वित्तीय संस्थांकडूनही निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याशिवाय विद्याíथनी वसतिगृह आणि ‘नॅक’साठी आवश्यक असलेला अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वतंत्र निधी मिळणार असून, त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे डॉ. मालदार यांनी सांगितले.