तंटामुक्त गाव मोहिमेचा दुष्काळात आधार
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या २०११-१२ या पाचव्या वर्षांत उत्तर महाराष्ट्रातील २८७ गावे ‘तंटामुक्त गाव’ म्हणून जाहीर झाली आहेत. या गावांना पुरस्काराच्या स्वरूपात सुमारे सात कोटींचा निधी मिळणार आहेत. तंटामुक्त ठरलेल्या गावांमध्ये नाशिकने आघाडी घेतली असून या जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे १३८ गावे असून आदिवासीबहुल नंदुरबारमध्ये ही संख्या सर्वात कमी ११ गावे इतकी आहे. धुळे जिल्ह्यातील ७२ गावे तर जळगावमधील ६६ गावे तंटामुक्त गावांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. तंटामुक्त ठरलेल्या आणि दुष्काळाचा सामना करणाऱ्या गावांना या निधीचा वापर टंचाईवर मात करण्यासाठी करता येणार आहे.
गाव पातळीवर अस्तित्वातील तंटे सामोपचाराने मिटविले जावेत आणि भविष्यात तंटे निर्माण होणार नाहीत, या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणून शांततापूर्ण रचनात्मक समाजाची जडणघडण व्हावी, या भूमिकेतून राज्य शासनाने राबविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील पाचव्या वर्षांतील तंटामुक्त ठरलेल्या गावांची यादी गृह विभागाने बऱ्याच विलंबानंतर नुकतीच जाहीर केली आहे. या मोहिमेंतर्गत २०१०-११ या चवथ्या वर्षांत उत्तर महाराष्ट्रातील केवळ १३९ गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली होती. त्याचा विचार करता २०११-१२ या मोहिमेच्या पाचव्या वर्षांत तंटामुक्त गावांची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे, त्यात नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. या वर्षांत उत्तर महाराष्ट्रातील ३,२७५ गावे या मोहिमेत सहभागी झाली होती. या सर्व गावांचे जिल्ह्यांतर्गत आणि नंतर जिल्हा बाह्य मूल्यमापन समितीमार्फत मूल्यांकन करण्यात आले. या समितीने दिलेल्या अहवालानुसार शासनाने उत्तर महाराष्ट्रातील २८७ गांवे तंटामुक्त गावे म्हणून जाहीर केली.
तंटामुक्त गावांच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील १३८ गावांचा समावेश असून त्यांना तीन कोटी ४० लाख रूपये पुरस्काराच्या स्वरूपात मिळणार आहेत. जळगावमधील ६६ गावांना एक कोटी ५० लाख, धुळे जिल्ह्यातील ७२ गावांना एक कोटी ८६ लाख आणि नंदुरबार जिल्ह्यातील ११ गावांना १९ लाख रूपयांची रक्कम मिळणार आहे. तंटामुक्त गावांची संख्या वाढविण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांनी लक्षणिय यश मिळविले.
२०१०-११ वर्षांत नाशिक जिल्ह्यातील केवळ ४२ गावे तंटामुक्त गाव म्हणून पात्र ठरली होती. पाचव्या वर्षांत ही संख्या ९६ गावांनी वाढली. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या गावांचे प्रमाण कमी झाले असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी प्रभावीपणे जनजागृती करून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविण्याकडे लक्ष
केंद्रीत केले. या शिवाय, मोहिमेंतर्गत करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाही योग्य पद्धतीने राबविल्या जातील, याकडे पोलीस ठाण्यांनी लक्ष दिले. त्याची परिणती उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ज्या गावांना यापूर्वी तंटामुक्त गाव पुरस्कार जाहीर झाला आहे, अशा गावांना समावेश २०११-१२ या मोहीम वर्षांतील तंटामुक्त गाव पुरस्कारप्रात्र गावाच्या यादीत असल्यास त्यांना पुरस्कार मिळणार नसल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. तंटामुक्त ठरलेल्या सर्व गावांना लोकसंख्येच्या आधारावर रोख रकमेचा पुरस्कार मिळतो. या निधीचा वापर ग्रामपंचायतींना दुष्काळावर मात करण्यासाठी करता येईल. ही मोहीम राबविताना शासनाने या निधीचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी करता येईल हे सूचित
केले आहे.
त्यात गावातील जलस्त्रोतांचे संरक्षण करणे, शुद्धीकरण व अभिवर्धन, गावासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी व गावतळी यातील गाळ उपसून जलसाठय़ात वाढ करण्याची व्यवस्था, गावातील वाहणारे ओढे व नदीचे शुद्धीकरण करण्यासाठी करणे यांचा समावेश आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. टंचाईच्या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतींना या निधीचा वापर करता येईल.
नाशिकमध्ये कळवण तालुका अव्वल
२०११-१२ या वर्षांत नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात सर्वाधिक गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली असून पेठ तालुक्यातील एकही गाव या यादीत समाविष्ट होऊ शकले नसल्याचे दिसून येते. निफाड तालुका (१३ गावे), कळवण (२३), चांदवड व सिन्नर प्रत्येकी (२), सुरगाणा व नांदगाव प्रत्येकी (६), दिंडोरी, देवळा व नाशिक तालुका प्रत्येकी (८), मालेगाव (२२), सटाणा (११), त्र्यंबकेश्वर (१७). येवला (५), ईगतपुरी (६) असा तालुकानिहाय गावांचा तंटामुक्त गावांच्या यादीत समावेश आहे.