ठाण्यात महापौर कुणाचा बसणार हे ठरवताना थेट ‘किंगमेकर’च्या भूमिकेत शिरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या डोंबाऱ्याचा खेळ सुरू झाला असून महापौर निवडणुकीत शिवसेनेला, स्थायी समिती सभापतीपदासाठी काँग्रेसला आणि दीड वर्षांने पुन्हा कोलांटउडी घेत तटस्थ राहण्याची तयारी करत अप्रत्यक्षपणे युतीला मदत करण्याच्या हालचाली मनसेच्या गोटात सुरू झाल्याने ठाणेकरांचे मात्र मनोरंजन होऊ लागले आहे. ठाणे महापालिकेतील राजकीय परिस्थिती अस्थिर असल्यामुळे मनसेच्या सात नगरसेवकांना कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. सत्ता स्थापनेचे ‘गणित’ या नगरसेवकांच्या बळावर ठरत असल्याने युती आणि आघाडी अशा दोन्ही बाजूंकडून मनसे नगरसेवकांना चुचकारण्याचा प्रयत्न होतो आहे. या पाश्र्वभूमीवर स्वत:चे वेगळे अस्तित्व ठसविण्याऐवजी नेत्यांच्या हुकूमानुसार कधी युतीकडे तर कधी आघाडीकडे असा टोलवाटोलवीचा प्रवास नगरसेवकांना करावा लागत असल्याने मनसेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेना, भाजप, आरपीआय आणि अपक्ष नगरसेवकांच्या युतीकडे ६५ तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष आघाडीकडे ५८ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात नगरसेवकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या ठाण्यातील तिघा आमदारांनी थेट राज ठाकरे यांची भेट घेत त्यांना मदतीसाठी साकडे घातले. राज यांनीही ठाण्यात येत महापौर निवडणुकीसाठी युतीला पाठिंबा जाहीर केला आणि काँग्रेस, राष्ट्रवादीने उभे केलेले कडवे आव्हान मोडीत काढण्यात शिवसेना नेत्यांना कसेबसे यश आले. ठाण्याची सत्ता राखताना शिवसेनेला मनसेचा टेकू घ्यावा लागला. या अस्थिर राजकीय परिस्थितीत सात नगरसेवकांच्या जोरावर महापालिकेत आणि महापालिकेबाहेर स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याची चांगली संधी ठाण्यातील मनसे नेत्यांना होती. मात्र राजगडावरून येणाऱ्या वेगवेगळ्या आदेशांची तालीम करताना स्थानिक नेत्यांना घाम फुटू लागल्याचे चित्र दिसत आहे.
कधी युती.. तर कधी आघाडी नाशिकच्या महापौर निवडणुकीत शिवसेनेने ठेंगा दाखविल्यामुळे ठाण्यात मनसेने युतीची साथ सोडली आणि आघाडीच्या तंबूत दाखल होण्याचा निर्णय घेतला. कोकण विभागीय आयुक्तांकडे आघाडीचा गट स्थापन करताना मनसेचे नगरसेवक त्यामध्ये सामील झाले आणि आघाडीकडे ६५ नगरसेवकांचे संख्याबळ जमा झाले. त्यानंतर झालेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सुधाकर चव्हाण या एकमेव मनसे सदस्याने काँग्रेसचे रवींद्र फाटक यांना मतदान केले. शिवसेनेने या निवडणुकीत बसपचे विलास कांबळे यांना िरगणात उतरवले होते. बसपला मतदान करणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. मात्र पक्षाचे सात नगरसेवक त्यापूर्वी आघाडीत का सामील झाले, याचे उत्तर राज यांना देता आले नाही. मनसेच्या एका मताच्या जोरावर युती आणि आघाडीकडे समसमान मते झाली आणि चिठ्ठी काँग्रेसच्या बाजूने पडल्याने रवींद्र फाटक सभापती बनले. त्यानंतर महापालिका सभागृहात वेगवेगळे ठराव मंजुरीस येताच मनसेचे नगरसेवक आघाडीच्या बाजूने मतदान करतात, असे चित्र होते.
गेल्या निवडणुकीतील करारानुसार यंदा स्थायी समितीचे सभापतिपद मनसेला देण्याचा निर्णय काँग्रेस आघाडीने घेतला होता. त्यानुसार अवघा एकमेव सदस्य असतानाही सुधाकर चव्हाण यांचा अर्ज भरायचा आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी त्यांना मतदान करायचे असे ठरले. मात्र चव्हाण यांनी आघाडीच्या पाठिंब्यावर अर्ज भरू नये, असे आदेश ऐन वेळेस आल्याने मनसेने या निवडणुकीत माघार घेतली असून युतीला अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी हा आदेश देण्यात आल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. आघाडीच्या पाठिंब्यावर मनसेला सभापतिपद मिळत असेल तर स्थानिक नेत्यांना ते हवेच होते.
 मात्र राजगडावरून फर्मान सुटले की त्याची तालीम करायची, या न्यायाने मनसेला माघार घ्यावी लागली आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली ठाणे महापालिकेची तिजोरी ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांनी घडवून आणलेल्या ‘भेटीगाठीं’चा हा परिणाम असल्याचे बोलले जाते.