बेळगाव जिल्ह्य़ातील विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी सुमारे ७० टक्के मतदान झाले. बेळगाव दक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार माजी महापौर संभाजी पाटील व भाजपाचे आमदार अभय पाटील यांच्यात बाचाबाची झाली. अभय पाटील यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झालाआहे. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्य़ातील १७ विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. महाराष्ट्र एकीकरण समितीला तीन ते चार ठिकाणी उमेदवार निवडून येतील, असा विश्वास वाटत आहे.    
सीमालढय़ाच्या दृष्टीने या वेळची बेळगाव जिल्ह्य़ातील निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. मराठी भाषकांचे गट-तट एकत्र येऊन त्यांनी बेळगाव दक्षिण (संभाजी पाटील), बेळगाव उत्तर (रेणू किल्लेकर), बेळगाव ग्रामीण (मनोहर किणेकर), खानापूर (अरविंद पाटील) आणि निपाणी (बाबासाहेब देसाई) अशा पाच मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मराठी भाषकांची एकी, प्रचाराला आलेली गती व पोषक वातावरण यामुळे या वेळी मराठी भाषक उमेदवारांच्या यशाची अपेक्षा वाढली आहे.    
बेळगाव दक्षिण मतदारसंघात आमदार अभय पाटील हे मतदान केंद्रात येणाऱ्या उमेदवारांना भाजपाला मतदान करावे, असा प्रचार करीत होते. तशा तक्रारी एकीकरण समितीचे उमेदवार संभाजी पाटील यांच्यापर्यंत पोहोचल्या. संभाजी पाटील व कार्यकर्त्यांनी तातडीने आमदार अभय पाटील यांना गाठले. त्यांनी या प्रकाराचा जाब आमदार पाटील यांना विचारला. आमदार पाटील यांनी उद्धट उत्तरे दिल्याने कार्यकर्ते संतापले. त्यातून संभाजी पाटील व अभय पाटील यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांना मराठी हिसका दाखविला. संभाजी पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार आमदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला.