दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ात वरुणराजाची कृपा झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले असून त्यामुळे ५८ हजार मुक्या जनावरांसाठीच्या ७४ चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. तर अद्याप २५० चारा छावण्या सुरू आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने अचानकपणे केलेल्या चारा छावण्यांच्या तपासणीत तफावत आढळलेल्या १२७ चारा छावण्यांपैकी १० छावण्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर उर्वरित ११७ छावणी चालकांना कारवाईच्या नोटिस बजावण्यात आल्या आहेत.
सांगोला व मंगळवेढा या दोन्ही दुष्काळग्रस्त तालुक्यांचा अपवाद वगळता जिल्ह्य़ात सर्वत्र पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्य़ात पावसाची एकूण सरासरी ४८८.८३ मिली मीटर असून त्यापैकी आतापर्यंत १७०.४९ मिमी सर्वसाधारण सरासरी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात आतापर्यंत सर्वसाधारण सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १९६.८९ मिमी सरासरी पाऊस पडला आहे. एकूण पावसाच्या ४०.२८ टक्के इतका पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक ६०.९१ टक्के पाऊस एकटय़ा माढा तालुक्यात झाला तर माळशिरस-५४.७९ टक्के, उत्तर सोलापूर-४४.८१ टक्के, बार्शी-४१.२३ टक्के, करमाळा-४० टक्के, मोहोळ-३८.४८ टक्के, पंढरपूर-३७.७९ टक्के याप्रमाणे समाधानकारक पावसाचे चित्र आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार दुष्काळात जिल्ह्य़ात सुरू झालेल्या चारा छावण्यांपैकी ७४ छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी अचानकपणे केलेल्या तपासणीत १४७ छावण्यांमध्ये नोंदणीपेक्षा जास्त तर १२७ छावण्यांमध्ये जनावरांच्या संख्येत तफावत आढळली होती. जनावरांचे व्हिडिओ चित्रीकरण, टॅग, बारकोडिंग आदी नियमांची पालमल्ली पुन्हा दिसून आली. यात १० छावण्यांमध्ये जनावरांच्या संख्येत आढळलेली तफावत मोठी असल्याने या छावण्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी गोकुळ मवारे हे जिल्हाधिकारी असताना त्यांनी केलेल्या तपासणीतदोष आढळलेल्या चारा छावणीचालकांना सुमारे तीन कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून ही दुसऱ्यांदा कारवाई होणार आहे.