हिंदी सिनेमातील आघाडीची ‘फिल्म फॅमिली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपूर घराण्यातील पृथ्वीराज कपूर यांचे धाकटे पुत्र आणि अभिनेता बलबीर राज ऊर्फ शशी कपूर यांचा १८ मार्च रोजी ७५वा वाढदिवस आहे. राज कपूर, शम्मी कपूर या बंधूंप्रमाणेच अभिनय कारकीर्द गाजविण्याबरोबरच इंग्रजी चित्रपटांतून अभिनय आणि लोकप्रिय सिनेमाहून वेगळ्या सिनेमांची निर्मिती करणारे शशी कपूर यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणारा लेख..
राज कपूर ‘सत्यम शिवम सुंदरम’च्या दिग्दर्शनात रमला असतानाचे म्हणजे १९७७चे दिवस..
चेंबूरच्या आर. के. स्टुडिओत चित्रीकरणाचे पहिले सत्र पार पडले आणि लोणी येथील पुढील चित्रीकरणाच्या वेळी सिनेपत्रकारांचा दौरा आयोजित करण्याचे आर. के. फिल्मचे प्रसिद्धीप्रमुख बनी रुबेन यांनी ठरवले. पण राज कपूरला शशी कपूरच्या ‘हव्या त्या तारखा’च मिळेनात. मुंबईतही तो कधीच एका चित्रपटाच्या सेटवर स्थिर नसे. एका चित्रपटाच्या सेटवर तो यायचा, तोच त्याला दुसऱ्या चित्रपटाच्या सेटवर जाण्याची घाई असे. त्याचे ते झपाटल्यासारखे काम करण्याचे दिवस होते.
शशी कपूरच्या त्याच त्या ‘पळापळी’वरून राज कपूरने त्याला नाव दिले ‘टॅक्सी हीरो.’ टॅक्सी कशी एका प्रवाशाला इच्छितस्थळी सोडून झाले की दुसऱ्या प्रवाशाला घेऊन निघते, तसे शशी कपूरचे ते दिवस होते.
‘राज कपूरचे बोल’ शशी कपूरची ‘ओळख’ अथवा ‘प्रतिमा’ झाली नसती तर त्यात आश्चर्य होते. मोठय़ा माणसांची प्रमाणपत्रे अथवा शाबासकी कधीच वाया जात नसते, त्यात तो राज कपूर असेल तर, त्याला ‘वलय’ प्राप्त होते. एका मोठय़ा भावाकडून झालेली ती छोटय़ा भावाची खरी (वस्तुस्थितीपूर्ण) स्तुती.
तो ‘टॅक्सी हीरो’ १८ मार्च २०१३ रोजी आपल्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहे. १९३८ साली कोलकाता (तेव्हाचे कलकत्ता) येथे या ‘बलवीरराज’चा जन्म झाला. सिनेमासाठी तो ‘शशी’ झाला. त्याची पत्नी जेनिफर हिच्या निधनाचे दु:ख ही त्याच्या एकूण वाटचालीतील सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट!
कुणाल, करण व संजना अशा तीन पुत्रांचा हा पिता गेली काही वर्षे व्हीलचेअरवरच आहे. राजेश खन्नाच्या शोकसभेसाठी त्याही स्थितीत तो आला. शशी कपूरला पत्नीच्या आजारपणाच्या उपचारासाठी पैसे हवे असताना त्याने मोठय़ाच प्रमाणावर चित्रपटातून भूमिका साकारल्या, तेव्हा राजेशने आपल्या बॅनरखालील ‘अलग अलग’मध्ये (दिग्दर्शक शक्ती सामंता) शशी कपूरला संधी दिली, ही गोष्ट व आपला एक समव्यावसायिक हे नाते शशी कपूर विसरला नाही असे म्हणावे लागेल. त्यात ‘माणूस’पण दिसते.
‘कपूर’ खानदान म्हणजे देखणेपण व कॅमेऱ्यासमोरचा सहज वावर याची दैवी देणगी हे नाते आज आपण करिना-रणबीरच्या रूपाने पाहतो आहोत. पृथ्वीराज कपूरचे शेंडेफळ व राज-शम्मीचा धाकटा भाऊ शशी कपूरमध्ये अशा वैशिष्टय़ासह आणखी काही खासियती दिसल्या. त्याची आपली ‘स्वत:ची ओळख’ आहे. राज कपूरप्रमाणे त्याच्यात भाबडेपण, प्रेमाची उत्कटता, सेक्स अपील व संगीताची जाण या साऱ्याचे रसायन नाही आणि शम्मीसारखा धसमुसळेपणा, काहीसा बेपर्वा लूक त्याच्यात नाही; तरीही शशीत बरेच काही दिसते. ‘सभ्य गृहस्थहो’ अशा पठडीतील त्याची प्रकृती-प्रवृत्ती दिसते. हा ‘जंटलमन’ प्रेयसीपासून थोडासा अंतरावर राहूनही त्याचे प्रेम खुलले (‘जब जब फुल खिले’मध्ये नंदासोबत, ‘आमने सामने’, ‘वक्त’, ‘आ गले लग जा’मध्ये शर्मिला टागोरसोबत, ‘हसिना मान जाएगी’त बबितासोबत, ‘शर्मिली’त राखीसोबत, ‘फकिरा’मध्ये शबाना आझमीसोबत).
शशी कपूर म्हणजे रुपेरी नम्र प्रेमिक असे म्हणायला हवे, असेही ‘पुरुष’ स्त्रियांवर मोहिनी टाकतात. शशी कपूरदेखील देव आनंद व राजेश खन्नाप्रमाणे ‘रोमॅन्टिक हीरो’ म्हणून स्त्री-चाहत्यांत आपले स्थान निर्माण करू शकला. ती त्याची मोठीच मिळकत. ‘कपूर’ना सुखावणारी गोष्ट.पण आघाडीच्या ‘हीरो’त त्याला ‘आपली ओळख’ निर्माण करायला वेळ लागला. तो आला तेव्हा देव-दिलीप-राज हे त्रिकूट फॉर्मात होते, त्यात राजेन्द्रकुमार- मनोजकुमार- सुनील दत्त- राजकुमारची भर पडली. प्रत्येकाची आपापल्या गतीने/ पद्धतीने वाटचाल सुरू राहिली. या ‘ट्रॅफिक जाम’मधून आपला रस्ता काढेपर्यंत संजीवकुमार- धर्मेन्द्र-जीतेंद्र-राजेश खन्ना अवतरले. शशी कपूरला ‘आपली वाट’ काढणे वा शोधणे कसे अवघड होते बघा. राजेश खन्नाच्या ‘सुपरस्टार’ झंझावातात तो झाकाळून गेला. थोडासा बाजूला पडला. पण अमिताभ बच्चनचे ‘युग’ संचारताच शशी कपूरला त्याचा ‘सहनायक’ म्हणून यशस्वी वाटचाल करता आली. सिनेमाच्या जगात ‘हालात बदलते रहते है’ व त्या बदलत्या परिस्थितीत स्वत:ला ‘फिट’ ठेवण्याचे शहाणपण हवे. शशी कपूरने ते दाखवले व यश चोप्रांच्या ‘दीवार’मधील इन्स्पेक्टर रवीची नवीन निश्चलने नाकारलेली भूमिका स्वीकारली. त्यात तो अमिताभच्या सगळ्याच प्रकारच्या ‘उंची’पुढे निष्प्रभ ठरला, पण ‘दीवार’चे यश (प्रदर्शन २४ जानेवारी १९७५) शशी कपूरच्या कारकीर्दीला ‘नवे वळण’ देणारे..‘दीवार’, ‘रोटी, कपडा और मकान’, ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’, ‘दो और दो पाँच’, ‘सुहाग’, ‘नमक हलाल’, सिलसिला’, ‘इमान धरम’, ‘कभी कभी’, ‘शान’ अशा चित्रपटांत शशी कपूर अमिताभची जणू ‘नायिका’ होता. ‘जोडी’ क्या बनी थी. नायकाच्या जोडीचा हा विक्रम ठरावा.
आपण ‘सीनियर’ असूनही कथा व श्रेयनामावलीत स्वत:कडे ‘दुय्यम’ स्थान घेण्यासाठी लागणारा मोठेपणा शशी कपूरकडे होता. सिनेमाच्या जगातला हा दुर्मीळ गुण. मल्टी स्टार कास्ट चित्रपटाच्या या काळात शशी कपूरने कसलाही ‘इगो प्रॉब्लेम’ न करता स्वत:ला ‘फिट’ बसवले. राजेश खन्ना (प्रेम कहानी, अलग अलग), शत्रुघ्न सिन्हा (अमर शक्ती, गौतम गोविंदा, अतिथी), संजीवकुमार, मुकद्दर, मुक्ती, (तृष्णा), रणधीर कपूर (हिरालाल पन्नालाल), ऋषी कपूर (दुसरा आदमी, दुनिया मेरी जेब में) अशा अनेकांसोबत ‘जोडी’ जमवत खुलवत शशी कपूरच्या कारकीर्दीने वेग घेतला. तेच तर महत्त्वाचे असते. पुतण्यासोबतही दुय्यम स्थान घेण्यात त्याने कमीपणा मानला नाही. यासाठी स्वभावात लवचीकपणा लागतो. आघाडीच्या सर्वच तारकानी त्याला ‘नायक’ म्हणून स्वीकारले.
नंदा (चार दीवारी), राजश्री (दिल ने पुकारा), आशा पारेख (प्यार का मौसम), मुमताज (चोर मचाये शोर), शर्मिला टागोर (सुहाना सफर) असे करता करता तो ‘पुढील पिढी’च्या नायिकांनादेखील ‘सूट’ झाला. हेमा मालिनी (अभिनेत्री, आप बीती), मौशमी चटर्जी (नयना), रिंकू जयस्वाल (मिस्टर रोमिओ), रेखा (चक्कर पे चक्कर, दो मुसाफिर), राखी (शर्मिली, तृष्णा), नीतू सिंग (दीवार, शंकरदादा), सुलक्षणा पंडित (सलाखे), झीनत अमान (सत्यम शिवम सुंदरम, दीवानगी), शबाना आझमी (हीरा और पत्थर, फकिरा), परवीन बाबी (चोर सिपाही), विद्या सिन्हा (मुक्ती), सायरा बानू (कोई जीता कोई हारा).. शशी कपूरने आपली इनिंग एन्जॉय केली, मनसोक्त उधळला, छान रंगला, त्याच्या ‘अभिनया’बाबत बोलण्याची संधी फारशी कधी मिळालीच नाही. आपलं रूपडं हाच आपला अभिनय त्याने मानले असले तरी त्याबाबत त्याच्या चाहत्यांची तरी तक्रार कुठे होती? उत्स्फूर्तता व नृत्याची आपली खांदे उडवायची स्वतंत्र शैली या गुणांवर तो यशस्वी ठरला..
पण तो ‘या सेटवरून त्या सेटवर’ असा का बरे धावायचा? ‘मागणी वाढली’ या कारणापेक्षा अन्य काही कारणे होती. ‘निर्माता’ म्हणून वाटचाल करताना त्याने ‘हटके’ मार्ग स्वीकारला. ‘फिल्लमवालाज’ हे त्याच्या बॅनरचे नाव. त्याद्वारे त्याने ‘३६ चौरंगी लेन’ (दिग्दर्शिका अपर्णा सेन), ‘कलयुग’ (दिग्दर्शक श्याम बेनेगल), विजेता (दिग्दर्शक गोविंद निहलानी) अशा चित्रपटांची निर्मिती केली. ‘अभिनेता’ म्हणून कमावलेली मिळकत त्याने ‘निर्माता’ बनल्यावर दुर्दैवाने गमावली.
 निर्मितीसह त्याने दिग्दर्शनातही पाऊल टाकत ‘अजूबा’वर लक्ष केंद्रित केले, पण अमिताभसारखे अस्सल नाणे असूनही ही फॅण्टसी फसली.. याच चित्रपटाच्या निमित्ताने शशी कपूरच्या मुलाखतीचा योग आला असता या ‘प्रसन्नमूर्ती’शी नेमके काय बोलावे याबाबत गोंधळलो. ‘कपूरना अनुभवायचे असते, त्यांच्या सहवासात स्वत:ला हरवू द्यायचे असते, त्यांना उगाचच कोडय़ात टाकायचे नसते’ हा तेव्हा मिळालेला धडा ‘साँवरियाँ’च्या वेळी रणबीर कपूरला भेटतानाही लक्षात ठेवला. ‘ठीक है’ हे शशी कपूर खूप वेगळ्या पद्धतीने उच्चारतो हे त्या भेटीत लक्षात आले. इतकं सगळं यश अनुभवल्यावरही त्याच्यात कधी फिल्मीपणा जाणवला नाही. पत्नी जेनिफरच्या मृत्यूनंतरचा त्याचा ‘स्क्रीन’ साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला ‘उदास’ चेहरा पाहवत नव्हता. या धक्क्य़ाची वेदना त्यावर उमटली होती. त्याच्या दोन्ही मुलांना चित्रपटात विशेष काहीच करता आले नाही. कुणालला आपण ‘आहिस्ता आहिस्ता’त पद्मिनी कोल्हापुरेचा तर करणला ‘सल्तनत’मध्ये जुही चावलाचा ‘हीरो’ म्हणून पाहिले.
रूपाने देखणे असले तरी त्यांना अभिनयात काही रस असल्याचे ‘दिसले’ नाही. करण व संजना मॉडेल म्हणून आकर्षक. ‘कपूर खानदानाचा देखणे’पणाचा वारसा त्यांनी काही काळ चालवला..आमिर-सलमान-शाहरुख असे ‘खान’दानी हीरो जम बसवू लागले, त्यात शशी कपूर हे नाव मागे पडणे स्वाभाविक होते. त्याचे फिल्मी पार्टीतले दर्शनही दुर्मीळ झाले. जुहूला आपल्या पित्याच्या स्मरणार्थ ‘पृथ्वी थिएटर’ची उभारणी करीत त्याने कलेशी बांधिलकी जपली. त्याबाबत तो गंभीर वाटतो. काही मराठी नाटकांसाठी तो प्रमुख पाहुणा म्हणूनही हजर राहिला. त्याची प्रोत्साहन देण्याची वृत्ती दाद देण्यासारखी!
कोणताही कपूर सिनेमापासून दूर झाला की त्याचे शरीरही सुटते, शशी कपूरही याला अपवाद नाही. अभिनयाच्या मर्यादा (तरी) भरपूर चित्रपट, पण वेगळ्या प्रवाहातील चित्रपटाचा गुणी निर्माता वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत असल्याबाबत शुभेच्छा! कपूरना असे सुखाचे क्षण अधिकच खुलवतात.