नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील अंतीम चित्र स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखा आता खऱ्या अर्थाने मतदानाच्या तयारीला लागली आहे. नाशिकसह संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान प्रक्रिया पार पडणार असली तरी सेना दलातील मतदारांसाठी पारंपरिक मतपत्रिकांचा वापर केला जातो. त्यासाठी येरवडा शासकीय मुद्रणालयात ८,९०६ मतपत्रिकांची छपाई करण्यात आली असून शुक्रवारी त्या मतपत्रिका टपालाने पाठविण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्याची प्रक्रिया याच दिवशी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर निवडणूक यंत्रणेने मतदानाशी संबंधित वेगवेगळ्या कामाला वेग दिला आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघात अंतिमत: रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची स्पष्टता झाली आहे. यामुळे ही मुदत संपुष्टात आल्यावर ४८ तासांच्या आत म्हणजे दोन दिवसांच्या कालावधीत टपाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते. सेनादलातील मतदारांचे हे मुख्यत्वे मतदान आहे. देशभरात वेगवेगळ्या भागात कार्यरत असणाऱ्या या मतदारांना मतपत्रिका वेळेत पाठविणे महत्वाचे असते. कारण, संबंधितांपर्यंत त्या वेळेत पोहोचल्या नाहीत तर त्या पुन्हा निवडणूक यंत्रणेपर्यंत येण्यास बराच वेळ लागतो. प्रारंभी विलंब झाल्यास संबंधितांच्या मतपत्रिका विहित मुदतीत प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी उमेदवार करत असतात. यंदा तसा आक्षेप घेऊ नये म्हणून यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. गुरूवारी येरवडा मुद्रणालयात छपाई केलेल्या या मतपत्रिका ताब्यात मिळाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. सायंकाळपर्यंत या मतपत्रिका निवडणूक यंत्रणेच्या हाती पडतील आणि रातोरात त्या कोणाला व कुठे पाठवायच्या याची तयारी केली जाणार आहे. शुक्रवारी दुपापर्यंत या मतपत्रिका टपालाने पाठविल्या जातील असेही त्यांनी नमूद केले.
नाशिक जिल्ह्यात सेना दलातील मतदारांची एकूण संख्या ८ हजार ९०६ आहे. त्यात नाशिक मतदार संघात ४०६०, दिंडोरीत ३५४१ तर धुळे मतदार संघात १३०५ मतदार आहेत. या सर्व मतदारांना शुक्रवारी कागदी मतपत्रिका टपालाने रवाना होतील. मतदान प्रक्रियेसाठी दोन्ही मतदार संघात एकूण १८ हजार ७४७ व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. अधिकारी वा कर्मचारी यांचे ज्या मतदान केंद्राच्या यादीत नांव आहे, त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जावू नये असा निकष आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्याचा पहिला टप्पा संगणकीय आज्ञावलीद्वारे आधीच पार पडला आहे. दुसरा टप्पा शुक्रवारी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ही प्रक्रिया झाली तरी कोणत्या मतदान केंद्रावर कोण अधिकारी वा कर्मचारी असतील ही बाब गोपनीय राखली जाईल. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे मतदानाचे साहित्य देताना प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला आपली नियुक्ती कोणत्या केंद्रावर झाली ते समजणार आहे.