ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टरच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीतील आठ उद्योजकांची जर्मनीतील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. परवा (शुक्रवार) हे उद्योजक जर्मनीला रवाना होणार आहेत.
सीआयआय ही भारतीय संस्था व जर्मन सरकार यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी देशभरातून ४० उद्योजकांची निवड करण्यात आली आहे. त्यातील आठजण एकटय़ा नगरचे आहेत. या सर्वाना जर्मनीत एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तेथील वेगवेगळय़ा उद्योगांना भेटी, व्यवस्थापनातील नवीन पद्धती आदी गोष्टींचा त्यात समावेश आहे.
नगर येथील ऑटो क्लस्टरचे संचालक चिन्मय सुखटणकर यांच्या नेतृत्वाखालील या आठजणांमध्ये सुहास भिंगारे, अनिरुद्ध बोपर्डीकर, गौरव गंधे, प्रफुल्ल नातू, सौरभ वाखारे, राहुल बजाज व तेज इंगळे यांचा समावेश आहे. ऑटो क्लस्टरच्या वतीने एका छोटेखानी कार्यक्रमात या उद्योजकांना या दौऱ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अनिल घैसास, कारभारी भिंगारे, अविनाश बोपर्डीकर, सतीश साळवेकर, मिलिंद कुलकर्णी,  वैशाली माळवदे आदी या वेळी उपस्थित होते. नगरमधील उद्योजकांना प्रथमच अशा स्वरूपाची संधी उपलब्ध झाली आहे.