होळी आणि धुळवड पाहता नागपूर शहर व ग्रामीण भागात एकूण आठ हजारांवर पोलीस तैनात केले जाणार असून मद्यप्राशनासह गोंधळ घालणाऱ्यांना गजाआड घातले जाणार आहे. काही दिवसांवर असलेली निवडणूक पाहता विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी नागपूर शहर व जिल्ह्य़ात एकूण दीड हजारांवर होळ्या पेटणार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. नागपूर शहरात राज्य राखीव पोलीस दल तसेच गृहरक्षकांसह एकूण सात हजारांहून अधिक पोलीस दुपारनंतर तैनात करण्यात येणार आहेत. धुळवडीलाही हा बंदोबस्त कायम राहील. शहरात ५० फिक्स पॉइंट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक पॉइंटवर प्रत्येकी एका उपनिरीक्षकासह पाचजणांचे सशस्त्र पथक तैनात राहील. अत्याधुनिक शस्त्रे त्यांच्याजवळ राहतील. राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्या व साडेचारशे गृहरक्षक शहरात आहेत. पंधरा जणांचा समावेश असलेले स्ट्रायकिंग पथक तयार करण्यात आले आहे. अशी दहा पथके विविध ठिकाणी तैनात राहतील. नियंत्रण कक्षातही राखीव ताफा सज्ज राहील. पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, तीन अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहा उपायुक्त या सर्वाजवळ स्ट्रायकिंग फोर्स राहील. अप्रिय घटना घडल्यास अवघ्या काही मिनिटात पोहोचता येईल, अशा जागी ते राहतील. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान दहा गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत. ठाण्यात मोजक्याच शिपायांना राहण्यास सांगण्यात आले असून इतर सर्व फिक्स पॉइंट अथवा गस्ती पथकात राहतील.  
शहरातील संवेदनशील वस्त्यांमध्ये तसेच धार्मिक स्थळांजवळ पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. तेथे प्रत्येकी दोन शिपाई तैनात राहतील. संवेदनशील वस्ती, प्रत्येक धार्मिक स्थळ तसेच चौरस्ता या ठिकाणी दर पाच मिनिटांनी गस्ती पथके जातील, अशा रितीने त्यांचे वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. बंदोबस्तात केवळ शिपाईच राहणार नसून पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त व त्यावरील वरिष्ठ अधिकारी सतत शहरात फिरणार आहेत.
शहरातील कुख्यात आरोपींना हद्दपार करण्यात आले असून अनेकजण ‘मोका’खाली कारागृहात आहेत. शहर व ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. अवैध दारू अड्डय़ावर छापे घालणे सुरू आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी लोखंडी कठडे लावून वेगात वाहने चालवणाऱ्यांवर अंकुश ठेवला जाईल. मद्यप्राशनासह गोंधळ घालणाऱ्यांची रवानगी थेट गजाआड केली जाणार आहे. ग्रामीण भागात तीन हजारांवर पोलिसांना तैनात केले जाणार असून प्रतिबंधात्मक कारवाई तसेच अवैध अड्डय़ांवर छापे घातले जात आहेत. बंदोबस्तामुळे नागपूर जिल्ह्य़ातील पोलिसांच्या साप्ताहिक सुटय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
होळी हा सण आनंदाचा, वाईट प्रवृत्तींना आळा घालण्याचा, द्वेषभावना संपवून आनंद वाटण्याचा सण आहे. मात्र कुणीही अनोळखी व्यक्तीवर जबरदस्तीने रंग अथवा गुलाल टाकूनये. अनोळखी लोक, रस्त्याने जाणारे – येणारे तसेच वाहनाने जाणाऱ्यांवर रंग अथवा पाणी टाकूनये. मद्यपान करून वाहने चालवू नयेत. रस्त्यापासून किमान ५० फुटापेक्षा दूर मैदानात होळी पेटवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले आहे.