महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८४.१४ टक्के इतका लागला. १ लाख ४ हजार ५६७ विद्यार्थ्यांपैकी ८७ हजार ९८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.८७ टक्के इतकी आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १०.२२ टक्के इतके जादा आहे. मराठी या विषयात सर्वाधिक, तर अर्थशास्त्र विषयात सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर पुनर्परीक्षार्थी(रिपीटर) विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३१.४८ टक्के इतके आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष बी.टी.कांबळे, सचिव शरद गोसावी, उपसंचालक व्ही.बी.पायमल यांनी गुरूवारी निकाल जाहीर केला. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी व मार्च महिन्यात घेण्यात आली होती. कला, विज्ञान, वाणिज्य व एम.सी.व्ही.सी. अशा चार विद्या शाखांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्य़ांसाठी एकूण १३० परीक्षा केंद्रांवर परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी तीन जिल्ह्य़ातील ५९१ कनिष्ठ महाविद्यांलयातील विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली होती.    
जिल्हानिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण याप्रमाणे (कंसात परिक्षेस बसलेले विद्यार्थी). सातारा- २७१९०-८३.१३ टक्के (३२७०७), सांगली-२४५९५-८४.६१ टक्के (२९०६७), कोल्हापूर-३६१९६-८४.५८ (४२७९३).पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी- सातारा-१२०४-२९.१४ टक्के (४१३२), सांगली- ८७५-२७.८० (३१४८),कोल्हापूर-१७७८-३५.७५ (४९७४).    
प्रमुख विषयांच्या निकालाची टक्केवारी याप्रमाणे- मराठी-९७.४३, इंग्रजी-८८.१४, हिंदूी-९३.३३,गणित-९१.६६, अर्थशास्त्र-८३.१६, अकौंटन्सी-७९.२४, भौतिकशास्त्र-९३.०५, रसायनशास्त्र-९४.८९,जीवशास्त्र-९५.८६.     बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरूवारी (३० मे) सकाळी ११ वाजता सादर करण्यात आला. या संकेतस्थळावर सर्व विद्यार्थ्यांंचे विषयनिहाय गुण उपलब्ध होणार आहेत. या माहितीची प्रत विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. त्याआधारे पुढील प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू करता येणार आहे. तथापि, हा प्रवेश मंडळाच्या अधिकृत गुणपत्रिकेच्या आधारेच संबंधित यंत्रणेकडून अंतिम मानला जाणार आहे.
 उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन    
फेब्रुवारी-मार्च २०१३ च्या परीक्षेपासून उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याकरिता प्रथम  उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाचदिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात योग्य ते शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.