मतदारांचे छायाचित्र गोळा करणे, दुबार, मृत व स्थलांतरित मतदारांचे नाव वगळण्याची प्रक्रिया निवडणूक विभागामार्फत सध्या सुरू असून, जिल्हय़ातील ८४ हजार ६४३ मतदारांची नावे वगळण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे प्रमुख उपजिल्हाधिकारी डॉ. विकास नाईक यांनी दिली.
अनेक मतदारांनी आपली नावे आपल्या गावाकडच्या मतदारयादीत नोंदवून ठेवली आहेत. ते त्या ठिकाणी वास्तव्यास नाहीत. मात्र, निवडणुकीत मतदानासाठी गावी येता यावे, यासाठी अशी नावे नोंदवून ठेवली जातात. निवडणूक विभागाने एखादा मतदार त्याने ज्या ठिकाणी नाव नोंदवले आहे, तेथे वास्तव्य करीत नसेल तर त्याचे नाव मतदारयादीतून वगळले जावे, असा आदेश बजावला होता. या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
जिल्हय़ातील ६८.८५ टक्के मतदारांची नावे वगळण्यात आली. उर्वरित ३१.३५ टक्के काम होणे बाकी आहे. वगळलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक प्रमाण औसा विधानसभा मतदारसंघात असून तब्बल २० हजार ४२० मतदारांची नावे वगळली. लातूर शहर मतदारसंघातील १६ हजार २५१, उदगीर १४ हजार ३०९, निलंगा १३ हजार ५६५, अहमदपूर ११ हजार ७८४, तर लातूर ग्रामीण मतदारसंघातील ८ हजार ३१४ मतदारांची नावे वगळली आहेत.
कर्मचाऱ्यांवर कारवाईची तलवार
जिल्हय़ातील अनेक शासकीय-निमशासकीय अधिकारी, कर्मचारी ज्या ठिकाणी नोकरी करतात, तेथे वास्तव्य करीत नसतील. मात्र, तेथे मतदारयादीत त्यांची नावे नोंदवली आहेत. निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशानुसार संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे नाव ज्या ठिकाणी मतदारयादीत आहे त्या ठिकाणी मुक्कामी नसेल, तर आयोगाच्या नियमानुसार संबंधितांवर कारवाई होऊ शकते. या नियमामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांचीही चांगलीच पंचाईत झाली आहे.