वाडा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होत असून (शनिवारी) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १७ जागांसाठी ८६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वाडा ग्रामपंचायतीबरोबरच तालुक्यातील अन्य १५ ग्रामपंचायतींचीही सार्वत्रिक निवडणूक होत असून यामध्ये चिंचघर ९ जागांसाठी ३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर नेहरोली ९ जागांसाठी ३५ अर्ज, हमरापूर ९ जागांसाठी २७ अर्ज दाखल झाले आहे. १२ नोव्हेंबर रोजी छाननी तर १६ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
तालुक्यात सर्वात मोठय़ा असलेल्या वाडा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप-शिवसेना यांची युती झाली आहे. बहुजन विकास आघाडी, मनसे हे स्वबळावर निवडणूक लढवीत आहेत. १२ हजारांहून अधिक मतदार असलेल्या वाडा ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे.
दरम्यान निवडणूक लढवू इच्छिणारे बरेचसे उमेदवार हे ग्रामपंचायतीचे घरपट्टी, पाणीपट्टीचे थकबाकीदार असल्याने या थकबाकीदार उमेदवारांनी निवडणूक लढण्यासाठी तात्काळ थकबाकी भरल्याने अवघ्या दोन दिवसांत वाडा ग्रामपंचायतीला ६५ हजार रुपयांचे घरपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळाले. वर्षांनुवर्षे थकबाकीदार राहणारे उमेदवार निवडून आल्यानंतर कार्य दिवे लावणार, अशी चर्चा आज मतदारांमध्ये सुरू होती.