सांगली महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘पुढारीच पुढारी सगळीकडे गेला मतदार कुणीकडे’ अशी स्थिती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दिसून आली. उमेदवारी दाखल करण्याच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली. झांजपथक, ढोलताशाच्या निनादात, फ़टाक्यांच्या आताषबाजीत व समर्थकांच्या जोरदार घोषणाबाजीत उमेदवारी अर्ज दाखल झाले. महापालिकेच्या ७८ जागांसाठी ६३३ जणांनी ८६१ उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी दाखल करण्यासाठी कार्यकर्ते मोठय़ा जल्लोषाने, मिरवणुकीने निवडणूक कार्यालयाकडे येत होते. आज दुपापर्यंत महापालिकेच्या मुख्य इमारतीनजिक असणाऱ्या प्रभाग कार्यालयात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. मिरजेच्या विभागीय कार्यालयासमोरसुद्धा गर्दीमुळे वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये प्रामुख्याने महापौर इद्रिस नायकवडी, माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान यांच्यासह विद्यमान सदस्य महंमद मणेर, शिवाजी दर्वे, विवेक कांबळे, सुरेश आवटी, महादेव कुरणे, आयेशा नायकवडी, नंदकुमार देशमुख आदींचा समावेश आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने शहरात पक्षांतराला उधाण आले आहे. गत निवडणुकीत काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसशिवाय अन्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया, (आठवले गट) कम्युनिस्ट आदींना एकत्र करुन विकास महाआघाडीची मोट बांधली होती.
पक्षाचे जोडे बाहेर ठेवून सत्तेसाठी एकत्र आलेल्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकास महाआघाडीला पूर्ण पाच वर्षे सत्ता राबविता आली नाही. आघाडीतील एकेक मोहरे बाजूला गेले. गेल्या एक वर्षांपासून महापालिकेतील सत्ता तांत्रिकदृष्टया आघाडीची असली तरी, आघाडीच्या नेत्यांना अंधारात ठेवूनच निर्णय राबविले गेले. यामुळे स्थायी समिती सभापती, प्रभाग सभापती, शिक्षण मंडळाचे पदाधिकारी याच्यावर परिणाम झाला.
दोन्ही काँग्रेसला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार संभाजी पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे ‘स्वाभिमानी विकास आघाडी’ या नावाखाली तिसरा पर्याय मतदारांसमोर आला आहे.
गत निवडणुकीत काँग्रेसला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी संघर्षांची भूमिका घेणारेच आता आघाडीला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी प्रयत्नशील झाल्याने चुरस वाढली आहे.
काँग्रेस उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी माजी मंत्री मदन पाटील यांचाच शब्द अखेरचा राहिल. असे जरी असले तरी, काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी पालकमंत्री पतंगराव कदम, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम हे काँग्रेसच्या शिबिराचे नेतृत्व करीत आहेत. अंतिम उमेदवारी निश्चित करण्यासाठी मंगळवारी पाच तासाहून अधिक काळ एका हॉटेलमध्ये चर्चा रंगली होती. सायंकाळी उशिरा काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार यादी मिरजेतील एका उद्योगपतीच्या फार्म हाऊसवर निश्चित करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष दिनकर पाटील, श्रीनिवास पाटील,संजय बजाज, इब्राहिम चौधरी असे मोजकेच कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 19, 2013 2:05 am