नेवासे येथे तेरा वर्षांपूर्वी झालेल्या शिवजयंतीच्या दंगलीतील सर्व ८७ आरोपींची श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
दि. १२ मार्च २००१ साली शिवजयंतीच्या मिरवणुकीत नेवासे येथील वाखुरे चौकात दगडफेक झाली होती. ही दंगल त्या वेळी शिवजयंतीच्या दिवशीची राज्यात गाजलेली घटना ठरली होती. या दंगलीत तत्कालीन नगर जिल्हा शिवसेनाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनादेखील आरोपी करण्यात आले होते व सुमारे ८७ जणांवर दंगलीचा आरोप ठेवण्यात आला होता. १३ वर्षे सदरचा खटला चालला. या दरम्यान खटल्यासंदर्भातील ८ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र आरोपींवरील गुन्हा सिद्ध होऊ शकत नसल्याने संशयाचा फायदा देऊन या खटल्यातील आरोपींना निर्दोष सोडण्यात आल्याचा निकाल जिल्हा व सत्रन्यायालयातील न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिला.
या खटल्यात आरोपींच्या वतीने वकील कृपाल माने, अरीफ शेख, रवींद्र भोसले, एस. एस. चौधरी यांनी काम पाहिले. या खटल्यातील तपासी अंमलदार, पोलीस निरीक्षक अशोक गजरमल यांच्यासह आरोपींपैकी काही जण या १३ वर्षांत मृत झाले आहेत.