शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात आदिवासी शेतकऱ्यांच्या ८८ जनावरांचा विचित्र आजाराने मृत्यू झाला असून यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यामुळे आदिवासी विकास विभागाने प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तालुक्यातील डोळखांब परिसरात मागील काही दिवसांपासून ८८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यात चिल्हारवाडी येथील ५५, लाखेचीवाडी २७ आणि मधलीवाडी येथील ६ जनावरांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य अशोक इरनक यांनी दिली. याबाबत आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ आयुक्तांना निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत शहापूरचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ए. पी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता विषबाधेने जनावरांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनावरे मृत्यू पावलेल्या भागात सर्वेक्षण केले असता चाऱ्यामध्ये असलेली मृत जनावरांची हाडे खाल्ल्याने जनावरांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. जनावरांच्या तपासणीसाठी चिल्हारवाडी परिसरात तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे. शुक्रवार ११ जानेवारी रोजी पुणे येथील पशुरोग अन्वेषण विभागाचे अधिकारी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.