नक्षल चळवळीत प्रेम व कुटुंब व्यवस्थेला मान्यता नसल्यामुळेच यावर्षी तब्बल ९ जोडप्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून सुखी संसाराचा मार्ग निवडला आहे. हे आत्मसमर्पित जोडपे आज गडचिरोलीत मुलाबाळांसोबत आनंदाने जीवन जगत आहेत.
रक्तरंजित क्रांतीला प्रेमाची भाषा अवगत नसल्यामुळे नक्षल चळवळीत सक्रीय होणाऱ्या प्रत्येक पुरुष व महिला सदस्याला कुटुंब व्यवस्था व प्रेमाच्या भानगडीत पडायचे नाही, अशी सक्त ताकीद दिली जाते, परंतु पोलिसांचा ससेमिरा चुकवीत जीव मुठीत घेऊन जंगलात वणवणारा नक्षल दलम सदस्य हा एकांतात प्रेमाच्या शोधात असतोच. त्यामुळे एकदा प्रेमात पडले की, मग त्याच्या मनात लग्न करून सुखी संसार करण्याचे स्वप्न घर करायला लागते. त्या क्षणापासूनच तो नक्षल चळवळीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो. मात्र, या काळात नक्षल कमांडरची महिला व पुरुष सदस्यांवर तेवढेच बारीक लक्ष असते. त्यामुळेच महिला व पुरुषांना एकत्र येऊ देत नाहीत. महिला सदस्यांची जबाबदारी महिला कमांडरकडे सोपविली जाते. यातून चळवळीत खटके उडायला सुरुवात होते व शेवटी या त्रासाला कंटाळून प्रेमात पडलेले दलम सदस्य किंवा विवाहित दाम्पत्य संधी शोधून चळवळीतून बाहेर पडतात आणि थेट पोलिसांच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेतात. गेल्या वष्रेभरातील प्रकरणे बघितली तर कमांडरच्या त्रासामुळेच जवळपास नऊ जोडप्यांनी चळवळ सोडून आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे. जहाल नक्षल उपकमांडर सनकु उर्फ लिंगा दारसु कुमोटी (२६) व पत्नी झुरी उर्फ जानी दसरू नरोटे (२५) या जोडप्याने नेमका हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आत्मसमर्पण केले. किंबहुना गोपी व शामको यांनीही आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे हा गोपी व शामकोला एकत्र येऊ देत नव्हता. त्या दोघांची ताटातूट व्हावी म्हणूनच त्याने शामकोला कामगिरीवर पाठविले होते. शेवटी पोलिसांच्या चकमकीत ती ठार झाल्यानंतर गोपीला एकटय़ालाच आत्मसमर्पण करावे लागले.
केवळ सनकु व झुरी हेच दाम्पत्य नाही, तर चळवळीतील अनेक दाम्पत्यांनी हाच विचार मनात ठेवून आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या वष्रेभरात गडचिरोली पोलिस दलासमोर एक डिव्हीसी, तीन कमांडर, सहा उपकमांडर, २५ नक्षल सदस्य, अशा एकूण ३५ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून यात ९ जोडप्यांचा समावेश आहे. यावरून विवाहबध्द झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये आता चळवळीपोटी प्रेम शिल्लक राहिलेले नाही, असाच निष्कर्ष निघतो. त्यामुळेच चळवळीत सक्रीय बहुतांश दाम्पत्य सुखी संसाराच्या शोधात आत्मसमर्पणाकडे वळले आहेत. यावरून प्रेम आणि विवाह या दोन गोष्टी नक्षल चळवळीसाठी अतिशय घातक ठरत आहेत. अशा स्थितीत दलम सदस्यांना चळवळीत सक्रीय ठेवण्याचे कठीण आवाहन नक्षली नेत्यांसमोर आहे. एकेक कमांडर चळवळ सोडून बाहेर पडत असल्याने चुकीचा संदेश जात आहे. त्यातच चळवळीत येण्यास कोणी इच्छुक नाही. याचा परिणाम प्रत्यक्ष जंगलात काम करणाऱ्या सदस्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी होत चालली आहे