सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विजापूर रस्त्यावरील टाकळी-भीमा पाणी योजनेच्या जलवाहिनीची दुरुस्ती हाती घेण्यात आल्याने येत्या १७ ते २५ ऑक्टोबपर्यंत शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
होनमुर्गी फाटा ते वडगबाळ दरम्यान असलेल्या १२०० मिलीमीटर व्यासाची १.६ कि.मी. जलवाहिनी तीन वर्षांपूर्वी खराब झाली होती. त्याच वेळी शहरात दूषित पाणीपुरवठयामुळे गॅस्ट्रोची साथ पसरून तब्बल २१ जणांचे बळी गेले होते. त्याची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने सोलापूर महापालिकेला पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करण्यासाठी १० कोटींचे अनुदान दिले होते. या अनुदानातून होनमुर्गी फाटा-वडगबाळपर्यंतची १.६ कि.मी. जलवाहिनी बदलून ती नव्याने घालण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु हे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. मात्र नूतन पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि हे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रशासनाला कामाला लावले.
नव्याने टाकलेल्या १.६ कि.मी. जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्याची जोडणी येत्या १७ व १८ ऑक्टोबरपासून केली जाणार आहे. त्यामुळे टाकळी पंप हाऊस व जलवाहिनीचे अन्य काम तसेच सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातील कामे केली जाणार आहे. नवीन जलवाहिनीची जोडणी झाल्यानंतर शहराला दररोज २१ एम.एल.डी. पाणी जादा प्रमाणात मिळणार असल्याचे पालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे यांनी सांगितले. या जलवाहिनी जोडणीचे कामामुळे टाकळी-भीमा पाणी योजनेतून दररोज ५५ एम.एल.डी. पाण्याचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळेच येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान शहराला दोन दिवसाआडऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.