मतदानाच्या निमित्ताने नागपूर शहरात निमलष्करी दलाच्या तुकडय़ांसह नऊ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले असून नजर जाईल तेथे पोलीस तैनात दिसतील. मतदान शांततेत व्हावे, अशी अपेक्षा पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक यांनी व्यक्त केली.
उद्या गुरुवारी सकाळी सात ते सहा या वेळेत होणार आहे. नागपूर आयुक्तालयांतर्गत २ हजार १३६ मतदान केंद्रे आहेत. सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक कंपनी (९० सशस्त्र जवान), राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या (सुमारे १८० सशस्त्र जवान), सात हजार पोलीस, १ हजार २०० गृहरक्षक, स्थानिक शीघ्र कृती दलाच्या दोन कंपन्या (सुमारे १८० सशस्त्र कमांडो), दंगल नियंत्रण पथक, रेल्वे सुरक्षा दल तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी असे एकूण नऊ हजाराहून अधिक सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी फिक्स पॉइंटवर पोलीस तैनात राहतील. याशिवाय प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला राखीव पथक देण्यात आले आहे.
निवडणुकीत पैसा, दारू वा इतर वस्तू वाटण्याच्या प्रकारालाला आळा घालण्यासाठी खास पथके तैनात आहेत. त्यामुळे विविध झोपडपट्टय़ा, वस्त्यांमध्ये पोलिसांची पाळत आहे. तेथे कोण, जाते व कण येते, यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला सशस्त्र पोलीस देण्यात आले आहेत. ९१ मतदान केंद्र संवेदनशिल असून तेथे विशेषत्वाने काळजी घेतली जात आहे.
 ठिकठिकाणी नाकाबंदी सुरूच असून वाहनांची तपासणी केली जात आहे. आचारसंहिता जारी झाल्यापासून ३२ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. चारजणांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले. विविध कलमांद्वारे दीड हजाराहून अधिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सात पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. २८ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर वाहतूक पोलीस तैनात राहतील. मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात वाहने नेता येणार नाहीत. सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक पांडेय व सुनील कोल्हे, निवडणूक बंदोबस्त समन्वयक विशेष शाखेचे उपायुक्त रामनाथ पोकळे, पोलीस माहिती कक्षाचे प्रमुख निरीक्षक सतीश देवरे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.