अजूनही ३०० गाडय़ा आरक्षित होण्याची शक्यता
यंदा गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळ १२२५ जादा गाडय़ा सोडणार आहे. त्यापैकी ९२५ गाडय़ांचे आरक्षण आधीच झाले आहे. या गाडय़ा ‘ग्रुप गाडय़ा’ प्रकारात आरक्षित करण्यात आल्या असून त्या एका विशिष्ट गावापर्यंतच जाणार आहेत. त्यामुळे या गाडय़ांचे आरक्षण करण्यासाठी कोकणातील अनेक प्रवासी संघटना पुढे सरसावल्या आहेत.
कोकणात आपापल्या गावी जाण्यासाठी चाकरमान्यांनी खासगी वाहनांसह अनेक पर्याय आरक्षित केले आहेत. रेल्वेने यंदा जाहीर केलेल्या विशेष गाडय़ाही संपूर्ण आरक्षित झाल्या आहेत. अशा वेळी एसटीने जाहीर केलेल्या विशेष गाडय़ांवर प्रवाशांच्या उडय़ा पडत आहेत. या गाडय़ांचे ग्रुप आरक्षण करण्यासाठी अनेक संघटना पुढे सरसावल्या आहेत. कोकणातील गावागावांतील ग्रामस्थ मंडळे मुंबईत कार्यरत असतात. त्यामुळे अशी मंडळे एकत्र येऊन आपापल्या गावी जाण्यासाठी एसटीची संपूर्ण बस आरक्षित करतात. गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ, या एकाच संस्थेने आतापर्यंत कोकणातील विविध गावांमध्ये जाणाऱ्या ६३५ गाडय़ा आरक्षित केल्या आहेत. या गाडय़ा ऑपेरा हाऊस, महालक्ष्मी, साईबाबा मार्ग परळ, सेनापती बापट मार्ग परळ, वरळी, जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रुझ, मालाड, बोरिवली, दहिसर, नालासोपारा, वसई, विरार, अर्नाळा अशा ठिकाणांहून रवाना होणार आहेत. या गाडय़ा कोकणातून परत येण्यासाठीही आरक्षित झाल्या आहेत. प्रवाशांना कोकणात इच्छित स्थळी सोडण्यासाठी एसटी नेहमीच प्रयत्नशील आहे.
‘गाव तिथे एसटी’ या आमच्या योजनेमुळे आम्हाला हा उपक्रम सोपा जातो, असे एसटीच्या एका बडय़ा अधिकाऱ्याने सांगितले.कोकणात जाणाऱ्या या गणपती विशेष गाडय़ांमुळे एसटीला आर्थिक फायदाही चांगलाच झाला आहे. ५५ सीट्सची एक बस पूर्ण भरून जात असल्याने आणि त्याचे पैसे महामंडळाला आगाऊ मिळत असल्याने एसटी अशा आरक्षणाला प्राधान्य देते. अद्याप ३०० गाडय़ा आरक्षित होणे बाकी असल्याने इतर कोणत्याही मार्गाने कोकणात पोहोचू न शकणाऱ्या प्रवाशांनी एसटीकडे वळावे, असे आवाहनही या अधिकाऱ्याने केले आहे.