पूर्वेतिहासाच्या आधारे ज्या केंद्रांवर मतदानाच्या वेळी काही घडण्याची (व्हनरेबल) शक्यता गृहीत धरण्यात आली आहे, त्यात जिल्ह्यातील ९४ मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान केंद्रांची संख्या ३०ने वाढली आहे. या सर्व केंद्रांवरील घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. निवडणूक आयोग सर्वसाधारण मतदान केंद्र सोडून संवेदनशील आणि मागील इतिहास लक्षात घेऊन काही घडण्याची शक्यता असलेले (व्हनरेबल) अशा गटात उर्वरित मतदान केंद्रांची विभागणी करीत असते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेने लोकसभा निवडणुकीत अशा काही निवडक केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. विधानसभा निवडणुकीत ही व्यवस्था होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मतदारांना धमकाविले जाईल वा मतदानासाठी प्रतिबंध केला जाईल, असे एकही केंद्र जिल्ह्यात नसल्याचे यंत्रणेने म्हटले आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आयोगाने विविध उपाय योजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघात ४,१९१ आणि नव्याने समाविष्ट झालेली १७ अशा एकूण ४२०८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील ६४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर झाली होती. त्यात नाशिक मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४२ मतदान केंद्रांचा समावेश होता. त्या तुलनेत दिंडोरीमध्ये १५ तर धुळे लोकसभा मतदारसंघात पाच असे प्रमाण होते. विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने सर्व मतदारसंघाचे सर्वेक्षण करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या विविध निकषांनुसार जिल्ह्यात ९४ मतदान केंद्रे ‘व्हनरेबल’ म्हणून निश्चित करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गीतांजली बाविस्कर यांनी सांगितले. ही मतदान केंद्र निवडताना काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. मागील निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर ७५ ते ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झाले असेल, ज्या मतदान केंद्रावरील एकूण मतदानापैकी ५० टक्क्यांहून अधिक मतदान एकाच उमेदवाराला झाले असेल याचा अभ्यास करून व्हनरेबल मतदान केंद्र ठरविण्यात आली आहे. या शिवाय, मागील निवडणुकीत एखाद्या केंद्रावर काही गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी असतील त्यांचाही या यादीत समावेश आहे.
२००९ मधील लोकसभा निवडणुकीत भालेकर हायस्कूलच्या मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्याची तक्रार केली गेली होती. या केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद-विवाद झाले. त्याची परिणती शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वाहनांच्या तोडफोडीत झाली. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे सायंकाळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हे मतदान केंद्रच ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याची तक्रार शिवसेनेने केली होती. इतर मतदान केंद्रांबद्दल काही किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही केंद्रांवर किरकोळ स्वरूपाचे वाद झाले होते. या सर्वाचा संदर्भ घेऊन जिल्ह्यातील ९४ मतदान केंद्रे ‘व्हनरेबल’ ठरविण्यात आली आहेत.
उपरोक्त केंद्रांवर मतदानावेळी असे
काही प्रकार घडू नयेत, याकरिता गत वेळी निवडणूक यंत्रणेने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा
पर्याय निवडला होता. जवळपास १५ ते २० केंद्रांवर मतदानाच्या दिवशी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे उपरोक्त केंद्रांतील घडामोडींवर बारकाईने नजर ठेवण्यात
आली. ही यंत्रणा कार्यान्वित करणे खर्चीक बाब असल्याने विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग पुन्हा केला जाईल की नाही याबद्दल स्पष्टता झालेली नाही.
संवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत जी ९४ केंद्र ‘व्हनरेबल’ म्हणून निश्चित झाली आहेत, त्या सर्व केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत उपरोक्त केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर नजर ठेवली जाईल. त्यातील काही मतदान केंद्रांवर लोकसभेप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे की नाही याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.
    – गीतांजली बावीस्कर
    उपजिल्हाधिकारी (निवडणूक)