विभाजनाची टांगती तलवार असणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत २०१२-१३च्या मूळ अर्थसंकल्पात २७ कोटी २९ लाख रुपयांची वाढीव तरतूद असणाऱ्या ९८ कोटी २६ लाखांच्या पुरवणी अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.
अपंग विद्यार्थ्यांना साहित्य, रस्ते दुरुस्ती, मोऱ्या तसेच प्रसाधनगृह सुविधा व दुरुस्ती, जिल्हा परिषदेच्या इमारतींमध्ये अपंगांसाठी रॅम्प व रेलिंग सुविधा, अपंग शेतकऱ्यांना १००टक्के अनुदानाने कृषी साहित्य, दारिद्रय़ रेषेखालील मागासवर्गीय कुटुंबांना सौरकंदील व दिवे पुरविणे आदी नव्या योजनांचा या अर्थसंकल्पात समावेश आहे. समाज कल्याण विभागास ३ कोटी ४३ हजार रुपये, इमारत व दळणवळणासाठी ३ कोटी ११ लाख रुपये, शिक्षण- १ कोटी ४७ लाख रुपये, पाटबंधारे व जलसंधारण-२ कोटी २४ लाख रुपये, सार्वजनिक आरोग्य-१ कोटी ४६ लाख रुपये, कृषी- ४२ लाख रुपये, पशुसंवर्धन ७६ लाख रुपये, सामूहिक विकास-१ कोटी ८५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुरुंदकर यांनी ७० कोटी ९६ लाख ९० हजार रुपयांचे मूळ अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र शासनाकडून मुद्रांक शुल्कापोटी मिळणारे २२ कोटी रुपयांचे अनुदान व आणखी काही निधी मिळणार असल्याने पुरवणी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.