अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या या वर्षीच्या पुरस्कारात नाशिककर रंगकर्मीनी बाजी मारली असून प्रायोगिक गटात नाटकासह लेखन, दिग्दर्शन, अभिनयासह एकूण सात विविध पुरस्कार मिळवले आहेत.
या पुरस्कारांची घोषणा मुंबईत नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. राज्यातील एकूण ३८ रंगकर्मीचा नाटय़ परिषदेच्या पुरस्कार्थीमध्ये समावेश आहे. त्यात नाशिकचे सहा रंगकर्मी असून राज्य नाटय़ स्पर्धेत बाजी मारलेले ‘न ही वैरेन वैरीणी’ या नाटकाला सवरेत्कृष्ट प्रायोगिक नाटकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या नाटकाचे दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी व अभिनेते हेमंत देशपांडे यांनाही दिग्दर्शन व अभिनयासाठी पुरस्कार जाहीर झाला. प्रायोगिक नाटय़लेखनात आपला वेगळा ठसा उमटविणारे नाटय़लेखक दत्ता पाटील यांना सवरेत्कृष्ट प्रायोगिक लेखनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक एकांकिकेसह बगळ्या बगळ्या कवडी दे, रिमझीम रिमझीम, कृष्णविवर, ही त्यांची अलीकडची नाटके रंगभूमीवर विशेष गाजली. या शिवाय, लोककलेला गौरविताना हा पुरस्कारही नाशिकला मिळाला आहे. लोककलावंत पुरस्कासाठी शाहीर दत्ता शिंदे यांची निवड झाली. रंगभूषेची समृध्द परंपरा चालविणाऱ्या नाशिक या क्षेत्रासाठी रंगभूषाकार रवींद्र जाधव यांना पुरस्कार जाहीर झाला. पडद्यामागे राबणाऱ्या कष्टाळू रंगकर्मीनाही नाटय़ परिषद गौरवत असते. यंदाचा गुणवंत रंगमंच कामगार पुरस्कार महाकवी कालिदास कला मंदिरात अनेक वर्ष राबणारे वसंत दौंड यांना जाहीर झाला. तब्बल सात पुरस्कार मिळाल्याबद्दल नाशिकच्या नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम व कार्यवाह तथा मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य सुनील ढगे यांनी आनंद व्यक्त केला.