मुलीचा जन्मदाखला केवळ एका रुपयात देण्याचा ठराव होऊन एक वर्ष झाले, तरी बदलापूर शहरात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तुषार सात्पे यांनी नगराध्यक्ष जयश्री भोईर यांना दिलेल्या निवेदनात हा ठराव त्वरित अमलात आणावा, अशी मागणी केली आहे.
एप्रिल २०१२च्या पालिका महासभेत या संदर्भातील ठराव मंजूर झाला आहे. सध्या जन्मदाखल्यासाठी नागरिकांना १९ रुपये मोजावे लागतात. राज्यातील मुलींचे घटते प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. या प्रश्नी जनजागृती म्हणून पालिका स्तरावर काय करता येईल, याविषयी महासभेत झालेल्या चर्चेच्या वेळी मुलीच्या जन्मदाखल्याची पहिली प्रत केवळ एक रुपया घेऊन देण्यात यावी, असा ठराव महासभेत संमत करण्यात आला. राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील यांनी हा ठराव मांडला आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी त्यास अनुमोदन दिले. मात्र सर्वमताने मंजूर झालेल्या या ठरावाची गेल्या १३ महिन्यात अंमलबजावणी मात्र होऊ शकलेली नाही. सध्या बदलापूर शहरात नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांवर अनुक्रमे जयश्री भोईर व वृषाली मेने या दोन्ही महिलाच आहेत. तेव्हा त्यांनी हा निर्णय त्वरित लागू करावा, असे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे.