पी.एम.रानडे यांनी गीतेचा अनुवाद इंग्रजी व मराठीत केला, तो त्यांना गीता अनुभवता आली म्हणून. अनुवादाचे अवघड काम ते करू शकले याचे कारण त्यांचे संचित मोठे आहे. म्हणूनच ‘पुरूषोत्तमीयगीतागवेषण’ हे रानडे सरांचे पुस्तक त्यांचे अक्षर स्मारक आहे, अशा आशयाचे प्रतिपादन पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ.यशवंत पाठक यांनी केले. ‘पुरूषोत्तमीय गीतागवेषण’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. आपल्या ओघवत्या व रसाळ भाषणाने त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात आवाडे यांनी, सर्वसामान्य माणसाला आचरणात आणता यावेत असे विचार या ग्रंथाच्या रूपाने त्यांनी मांडून ठेवले आहेत. हा ग्रंथ सर्वत्र जाण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे,असे मत व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, आवाडे जनता बँकेचेअध्यक्ष अशोक सौंदतीकर, प्र.ना.परांजपे, मंगला आपटे, सुधीर आपटे, आशा जोशी आदी होते. येथील गोविंदराव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कै.पी.एम.रानडे यांनी लिहिलेल्या पुरूषोत्तमीय गीतागवेषण या भगवत गीतेच्या मराठी व इंग्रजी अनुवादाच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पी.एम.रानडे प्रेमी व शिष्यवर्ग यांच्यावतीने राजवाडा दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. ‘रचना प्रकाशन’ इचलकरंजी यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.